JMC Election : जळगाव महापालिकेची रणधुमाळी सध्या सुरू आहे. या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर उमेदवारांच्या प्रचाराला वेग आला आहे. मंगळवार, दि.6 जानेवारी रोजी प्रभाग क्रमांक 14 अ मधील राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे अधिकृत उमेदवार अशोक सीताराम लाडवंजारी, प्रभाग क्रमांक 14 ब मधील उमेदवार तडवी नाजमीन मकबूल, प्रभाग क्रमांक 14 क मधील उमेदवार सना शेख रियाज, प्रभाग क्रमांक 14 ड मधील उमेदवार जमीलोद्दीन शेख शारीफुद्दीन शेख यांच्या प्रचारास भव्य रॅलीने शुभारंभ झाला. फटाक्यांची आतिषबाजी करीत तांबापूर परिसरातून भव्य रॅली काढण्यात आली.
या प्रचार रॅलीस राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे ज्येष्ठ नेते तथा माजी मंत्री एकनाथराव खडसे यांची प्रमुख उपस्थिती होती. आ.खडसे यांच्या प्रमुख उपस्थितीत इच्छादेवी मंदिरात श्रीफळ वाढवून प्रचाराचा शुभारंभ करण्यात आला. यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाचे महानगराध्यक्ष एजाज मलिक, समस्त लाड वंजारी समाज श्रीराम मंदिर मेहरूणचे अध्यक्ष चंद्रकांत लाडवंजारी, खाटीक समाजाचे महाराष्ट्र झोनल अध्यक्ष रईस खाटीक, अकिल खान, मुस्तफा मिर्झा, डॉ. अभिषेक ठाकूर, फिरोज खान, नईम खाटीक यांच्यासह तांबापूर परिसरातील मान्यवरांची उपस्थिती होती.
‘या’ मार्गावरून निघाली भव्य प्रचार रॅली
इच्छा देवी मंदिरात पूजा करून उमेदवार अशोक लाडवंजारी यांच्यासह प्रभाग क्रमांक 14 मधील सर्व उमेदवारांच्या प्रचार रॅली सुरुवात झाली. सदर रॅली इच्छादेवी मंदिरमार्गे फुकटपुरा चौक, शहीद अब्दुल हमीद चौक, टिपू सुलतान चौक, बिलाल चौक, महादेव मंदिर चौक, जुमा शहा वखार, मच्छी बाजार चौक, शिरसोली नाका तांबापुर परिसरातील डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा पुतळामार्गे शहीद अब्दुल हमीद चौक येथे प्रचार रॅलीचा समारोप करण्यात आला. या प्रचारादरम्यान नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद या प्रचार रॅलीत दिसून आला. अशोकभाऊ तुम आगे बढो, हम तुम्हारे साथ है, कोण म्हणतो येणार नाही, आल्याशिवाय राहणार नाही, कोण आया… शेर आया अशा विविध गगनभेदी घोषणांनी परिसर दणाणून गेला होता.यावेळी प्रभागातील नागरिकांनी राष्ट्रवादी काँग्रेस शरद चंद्र पवार पक्षाच्या उमेदवारांचे फुलांच्या पाकळ्या उधळून स्वागत केले प्रचारादरम्यान ठिकठिकाणी नागरिकांनी अशोकभाऊ लाडवंजारी यांना हार घालून सत्कार देखील केला. त्यांनी प्रेमाचे आभार मानत सर्वांचे अभिवादन केले.
माजी मंत्री एकनाथराव खडसे यांचे आवाहन
जळगाव महापालिकेचा रणसंग्राम सुरू आहे. वर्षानुवर्ष निवडणुका होत आहेत. मात्र प्रत्येक निवडणुकीत उमेदवारांकडून आश्वासने दिली जात आहे. जळगाव शहराचे सिंगापूर करू, मात्र सिंगापूर करण्याऐवजी धारावी झालेला आहे. पिण्याची पाण्याचा प्रश्न, आरोग्याचे समस्या अशा विविध समस्यांनी जळगाव शहराला हेरले आहे. मागील मनपा निवडणुकीत सिंगापूर करण्याची घोषणा केली होती. मात्र सिंगापूर ऐवजी धारावी झालेली आहे. सत्ताधार्यांकडे या निवडणुकीत 75 उमेदवार नव्हते. त्यामुळे त्यांनी सत्तेत असणारे उमेदवार आयात केले. त्यांनाच तिकीट देऊन या निवडणुकीत उभे केले. त्यामुळे त्यांच्याकडून फारशी अपेक्षा नाही. राष्ट्रवादी काँग्रेसने नवीन उमेदवारांना संधी दिली असून शहराचा विकास व्हावा, यासाठी तुतारीचे बटन दाबून त्यांना विजयी करावे, असे आवाहन आ. एकनाथराव खडसे यांनी यावेळी केले.
राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या उमेदवारांना फायदा होईल – अशोक लाडवंजारी
जळगाव महापालिका निवडणुकीसाठी चारही उमेदवार एक दलाने काम करीत आहेत. या प्रभागात गेल्या दहा वर्षात विकास खुंटलेला आहे. या प्रभागात विविध समस्या असून त्या मागील निवडणुकीत निवडून आलेल्या उमेदवारांना सोडविता आल्या नसल्याने जनते मध्ये रोष आहे. या प्रभागाचे नेतृत्व केलेल्या उमेदवारावर मनपाची भंगार पाईपलाईन चोरीचा गुन्हा देखील दाखल आहे. त्यावेळी भाजपने बंटी-बबली चोर है अशा घोषणा दिल्या होत्या. अशाच उमेदवाराला भाजपने उमेदवारी दिलेली आहे. त्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या उमेदवारांना त्याचा फायदा होईल व जनता निवडून देईल, असा आशावाद अशोक लाडवंजारी यांनी व्यक्त केला. या प्रभागांमधून निवडून आलेले उमेदवाराकडे महापौर तसेच विरोधी पक्ष नेतेपद भूषवलेली आहे. मात्र त्यांनी या प्रभागाचा विकास साधलेला नाही. आता आम्ही याच गोष्टीचा फायदा घेऊन मतदारांचे आशीर्वाद घेत आहोत. जनता आम्हाला साथ देतील,असा विश्वासही प्रभाग 14 मधील उमेदवार अशोक लाडवंजारी यांनी व्यक्त केला.
धारावीच्या धर्तीवर तंबापूर परिसराचा विकास करू – एजाज मलिक
महापालिका निवडणुकीत प्रभाग 14 मधील उमेदवारांच्या प्रचार शुभारंभ एकदम जबरदस्त रॅली काढून करण्यात आला आहे. हा शुभारंभ नव्हता तर विजयी रॅली वाटत होती. विशेष करून माजीमंत्री आ.एकनाथराव खडसे या रॅलीत सहभागी झाले होते. या गर्दीवरून असे दिसून येते की मतदारांमध्ये मोठा उत्साह होता. लोकांच्या चेहर्यावर हसू दिसून आले आणि उत्साह संचारलेला होता. या प्रभागातील नागरिकांना आवान करेन की, तुतारीचे बटन दाबून राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या उमेदवारांना निवडून द्या, असे आवाहन एजाज मलिक यांनी केले. राष्ट्रवादीने वचननामा पूर्ण करण्याचे आश्वासन देत तांबापूर झोपडपट्टी ही धारावीच्या धर्तीवर तंबापूर परिसराचा विकास करू, अशी ग्वाही देखील राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाचे महानगराध्यक्ष एजाज मलिक यांनी या प्रचार रॅलीप्रसंगी दिली. त्यांनी देखील प्रचार रॅलीत नागरिकांना अभिवादन केले.









