जळगाव : पत्नीच्या अनैतिक संबंधाला कंटाळून पतीने राहत्या घरात गळफास घेत आत्महत्या केल्याची घटना मेहुणबारे पोलिस स्टेशनच्या हद्दीत असलेल्या एका गावात घडली. याप्रकरणी दोघांविरोधात मेहुणबारे पोलिस पत्नी आणि तिचा प्रियकर या स्थानकात गुन्हा दाखल झाला आहे.
दाखल तक्रारीनुसार, मेहुणबारे पोलिस स्टेशनच्या हद्दीत असलेल्या एका गावातील महिलेचे गावातीलच एकाशी गेल्या दोन ते अडीच वर्षांपासून अनैतिक संबंध होते. ही बाब उघडकीस आल्यानंतर पतीने पत्नीच्या प्रियकराविरोधात मेहुणबारे पोलिस स्टेशनला तक्रार दिली. अनेक वेळा ही बाब पोलिस स्टेशनला गेल्याने यातून पती-पत्नीत वाद होत असत. या वादातून पत्नी माहेरी निघून गेली होती. परंतु नणंदेने समजूत काढत तिला पुन्हा सासरी आणले होते. मात्र, दहा दिवसांनी पुन्हा महिला प्रियकराशी बोलताना सापडली.
अखेरीस पत्नी व तिच्या प्रियकरामधील अनैतिक संबंधाला कंटाळून पतीने रविवारी रात्री घरातच फाशी घेतली. सोमवारी सकाळी ही बाब कुटुंबीयांच्या लक्षात आली. मयताच्या बहिणीने याबाबत मेहुणबारे पोलिस स्टेशनला तक्रार दिली असून पत्नी आणि तिच्या प्रियकराविरोधात आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
मोबाइलवर स्टेटस ठेवला अन्…
पत्नीचे गावातीलच एकाशी प्रेमसंबंध आहेत. अनेक वेळा समजावूनही ती ऐकत नसल्याने आपण आत्महत्या करत असल्याबाबत मयताने त्याच्या सोशल मीडिया अकाउंटवर स्टेटस ठेवले होते. मयताचा ६ ते ७ वर्षांपूर्वी विवाह झाला होता. त्याला दोन मुले असून घरात पती, पत्नी आणि दोन मुले असे चारजण राहत होते. मयत हा मजुरी करून घर चालवत होता.











