Maharashtra Weather : उत्तरेकडून येणाऱ्या थंड वाऱ्यांमुळे महाराष्ट्रातील किमान तापमानात लक्षणीय घट झाली आहे. परिणामी, अनेक भागात थंडीची लाट पसरली आहे. दरम्यान, पुढील तीन दिवस थंडीचा कडाका कायम राहील, असा अंदाज हवामान खात्याने वर्तवला आहे.
जानेवारी महिन्याच्या पहिल्या आठवड्यात देशभरात तीव्र थंडी जाणवत आहे. उत्तरेकडील थंड वाऱ्यांच्या प्रवाहामुळे महाराष्ट्रातील किमान तापमानात लक्षणीय घट झाली आहे. या थंडीचा परिणाम उत्तर आणि मध्य महाराष्ट्र तसेच विदर्भ आणि मराठवाड्यातही जाणवत आहे.
राज्यातील सर्वात कमी तापमान गोंदिया जिल्ह्यात नोंदवले गेले, त्यामुळे आता दिवसाही नागरिकांना थंडीचा अनुभव येत आहे. दरम्यान, पुढील तीन दिवस थंडीचा कडाका कायम राहील, असा अंदाज हवामान खात्याने वर्तवला आहे.
गोंदिया जिल्ह्यात थंडीच्या लाटेचा इशारा
दरम्यान, काल, मंगळवारी गोंदिया जिल्ह्यातील तापमानात आणखी घट होऊन ते ७ अंशांवर पोहोचले. विशेषतः या वर्षातील सर्वात कमी तापमान नोंदवले गेले आहे. हवामान खात्याने आज, बुधवारी गोंदिया जिल्ह्यात थंडीची लाट येण्याचा इशारा दिला आहे.










