Budget 2026 : देशाच्या अर्थकारणाच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाच्या असलेल्या बजेट २०२६ च्या तारखा अखेर जाहीर झाल्या आहेत. केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन येत्या १ फेब्रुवारी रोजी संसदेत आपला नववा अर्थसंकल्प सादर करणार आहेत. यासह पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या कार्यकाळात सर्वाधिक वेळा अर्थसंकल्प सादर करणाऱ्या त्या पहिल्या अर्थमंत्री ठरणार आहेत.
संसदेचे अर्थसंकल्पीय अधिवेशन २८ जानेवारीपासून सुरू होणार आहे. या अधिवेशनाची सुरुवात राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या दोन्ही सभागृहांच्या संयुक्त अभिभाषणाने होईल. संसदीय कार्य समितीने निश्चित केलेल्या संभाव्य वेळापत्रकानुसार, २९ जानेवारी रोजी बीटिंग रिट्रीट सोहळ्यामुळे संसदेचे कामकाज होणार नाही.
मोरारजी देसाईंच्या विक्रमाच्या दिशेने वाटचाल
निर्मला सीतारामन या यंदा ९ व्यांदा अर्थसंकल्प सादर करत आहेत. भारताच्या इतिहासात सर्वाधिक १० वेळा अर्थसंकल्प सादर करण्याचा विक्रम माजी पंतप्रधान मोरारजी देसाई यांच्या नावावर आहे. या अर्थसंकल्पानंतर सीतारामन या विक्रमाच्या अगदी जवळ पोहोचतील.
असे असेल वेळापत्रक
२८ जानेवारीः राष्ट्रपतींचे अभिभाषण
३० जानेवारीः आर्थिक पाहणी अहवाल सादर होणार.
१ फेब्रुवारी (रविवार): केंद्रीय अर्थसंकल्प सादर केला जाईल.
१३ फेब्रुवारीः अधिवेशनाचा पहिला टप्पा संपणार.
९ मार्च ते २ अप्रैलः अधिवेशनाचा दुसरा टप्पा पार पडेल.
३ एप्रिल रोजी गुड फ्रायडे आणि त्यानंतर शनिवार-रविवार सुट्टी असल्याने, हे अधिवेशन २ एप्रिल रोजीच समाप्त होण्याची शक्यता आहे.











