नंदुरबार : येथील नगरपरिषदेच्या उपनगराध्यक्षपदी निवड झाल्यानंतर निघालेल्या मिरवणुकीत झालेल्या वादाचे पडसाद शहरात शनिवारी रात्री उशीरा पाहण्यास मिळाले. या वादातून एका टोळक्याने माजी आमदार शिरीष चौधरी यांच्या घरावर दगडफेक व तोडफोड केल्याने घराचे मोठे नुकसान झाले. या प्रकरणी नंदुरबार शहर पोलीस ठाण्यात वेगवेगळे गुन्हे दाखल करण्यात आले आहे.
उपनगराध्यक्षपदी माजी आमदार शिरीष चौधरी यांचे पुत्र प्रथमेश चौधरी यांची निवड झाली. त्यांची शहरातून काढण्यात आलेल्या मिरवणुकीत जळका बाजार परिसरात दुपारी वाद उदभवला. या वादातून दोन गटात हाणामारी झाली. किरकोळ स्वरुपात दगडफेक करण्यात आल्याचे सांगण्यात आले. या प्रकरणी नंदुरबार शहर पोलीस ठाण्यात वेगवेगळे गुन्हे दाखल करण्यात आले आहे.
रात्री घराचर हल्ला
अज्ञातांनी रात्री उशीरा माजी आमदार शिरीष चौधरी यांच्या घराचर हल्ला केला. यात घराच्या काचा फुटल्या, हातात दांडके घेवून या टोळक्याने हा हल्ला केला. शिरीष चौधरी यांची गाडीदेखील जाळण्याचा प्रयत्न झाल्याचे सांगितले जात आहे. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी परिसरातचोख बंदोबस्त तैनात केला.
अवैध धंदेवाल्यांनीच हल्ला केल्याचा आरोप
दरम्यान, माझ्या घरावर झालेला हल्ला हे राजकीय षडयंत्र असून काही राजकीय पुढाऱ्यांच्या वरदहस्ताने अवैध धंदेवाल्यांनी माझ्या घरावर हा हल्ल्या केल्याचा आरोप माजी आमदार शिरीष चौधरी यांनी केला आहे.










