नशिराबाद : नशिराबाद नगर परिषदेच्या निवडणुकीनंतर आता स्वीकृत नगरसेवक व उपनगराध्यक्ष निवड मंगळवारी (दि. १३ जानेवारी) होणार आहे. बुधवार, १४ जानेवारीला मक संक्रांत असल्याने, त्याआधी होणाऱ्या या निवडीत विजयाच ‘गोड तीळगूळ’ नेमका कोणाल मिळणार, याची उत्सुकत शिगेला पोहोचली आहे.
सध्याच्या राजकीय समीकरणांनुसार भारतीय जनता पक्ष व शिवसेना (शिंदे गट) यांचा प्रत्येकी एक स्वीकृत नगरसेवक राहणार असल्याचे जवळपास निश्चित मानले जात आहे.
पडद्यामागची सूत्रे कुणाच्या हाती ?
मात्र, हा स्वीकृत नगरसेवक नेमका कोण असेल, यावरील पडदा अद्याप उठलेला नसून, ही निवड कुणाच्या शब्दावर ठरणार आणि पडद्यामागची सूत्रे नेमकी कोण हलवणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. स्वीकृत नगरसेवक पद हे पाच वर्षांसाठी एकदाच दिले जाणार की, दरवर्षी एक अशा पद्धतीने ५ वर्षांत ५ स्वीकृत नगरसेवक देण्याचा प्रयोग होणार, याबाबतही नगर परिषद व राजकीय वर्तुळात वेगवेगळ्या चर्चांना उधाण आले आहे. या मुद्द्द्यावर अद्याप स्पष्टता नसली तरी, काही वरिष्ठ नेत्यांकडून पर्यायांवर चाचपणी सुरू असल्याचे समजते.
हालचालींना आला वेग
दरम्यान, स्वीकृत उपनगराध्यक्ष पदाच्या निवडीमुळेही राजकीय हालचालींना अधिक वेग आला असून, स्वीकृत नगरसेवक व उपनगराध्यक्ष निवड या दोन्ही गोष्टी एकमेकांशी जोडलेल्या असल्याने निर्णय गुंतागुंतीचा झाला आहे. तर, नशिराबाद नगरपरिषदेत १३ तारखेला केवळ निवड नव्हे, तर सत्ता समीकरणांचा कस लागणार आहे. स्वीकृत नगरसेवकाच्या नावावर शिक्कामोर्तब होताच अनेक राजकीय गणिते स्पष्ट होणार आहेत. तोपर्यंत मात्र पडद्यामागील हालचाली, गुप्त भेटी आणि राजकीय डावपेच तापताना दिसत आहेत.
नगरसेवकांसाठी आवश्यक असलेल्या कायदेशीर योग्यता व पात्रतेनुसार संपूर्ण कागदपत्रांची पूर्तता करणे अनिवार्य असल्याने सध्या इच्छुकांकडून कागदपत्रांची लगबग सुरू आहे. अनुभव, सामाजिक कार्य, शैक्षणिक पात्रता व इतर निकष पूर्ण करण्यासाठी अनेक जणांची धावपळ सुरू असल्याचे चित्र आहे.









