जळगाव : अमळनेरहून सोनगीरकडे (ता. धुळे) जाणारी एसटी बस अचानक रस्त्याच्या बाजूला कलंडल्याची घटना तलवाडेनजीक (ता. अमळनेर) घडली. सुदैवाने बसमधील सर्व १५ प्रवाशांना कुठलीही इजा झालेली नाही. सर्व प्रवासी सुखरूप आहेत.
अमळनेर आगाराची (क्र. एमएच १४ बीटी २३४७) ही बस अमळनेरहून सोनगीरकडे निघाली. वाटेत तलवाडे गावाजवळ पुढे ट्रॅक्टर असल्याने चालकाने ओव्हरटेकचा प्रयत्न केला. मात्र वळणावर अचानक चालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटल्याने बस रस्त्याच्या बाजूला असलेल्या चारीत कलंडली.
अमळनेरहून सोनगीरकडे जाणारी एसटी बस बुधवारी दुपारी अचानक रस्त्याच्या बाजूला कलंडली. अपघातानंतर चालक आर.बी. ढवळे व वाहक वाय.बी. चव्हाण यांनी लागलीच प्रवाशांना खाली उतरविण्यास मदत केली. अपघाताची तीव्रता पाहता मोठी दुर्घटना टळली असून सुदैवाने एकाही प्रवाशाला इजा झाली नाही.
घटनेची माहिती मिळताच आगार प्रमुख प्रमोद चौधरी, वाहतूक निरीक्षक अनिकेत न्यालदे तसेच शाखा अधीक्षक प्रमोद बाविस्कर यांनी तत्काळ घटनास्थळी पाहणी केली. त्यांनी बसची स्थिती आणि अपघाताचा प्राथमिक अहवाल घेतला.









