Ajit Pawar death : महाराष्ट्राच्या राजकारणाला हादरवणारी घटना आज बुधवारी (दि. २८ जानेवारी) सकाळी घडली. उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासह पाच जणांचा बारामती विमानतळाजवळ झालेल्या विमान अपघातात मृत्यू झाला. जिल्हा परिषद व पंचायत समिती सार्वत्रिक निवडणुकीच्या प्रचारासाठी बारामती येथे येत असताना हा दुर्दैवी अपघात झाला. अजित पवार यांच्या अकाली एक्झिटने महाराष्ट्रावर मोठा दु:खाचा डोंगर कोसळला आहे.
अजित पवार यांचा राजकीय प्रवास
अजित पवार यांचा जन्म २२ जुलै १९५९ रोजी देवळाली प्रवरा, अहमदनगर येथे झाला. त्यांनी आपल्या राजकीय कारकिर्दीची सुरुवात १९९१ साली बारामती लोकसभा मतदारसंघाचे खासदार म्हणून केली. १९९९ पासून सलग अनेक वेळा बारामती विधानसभा मतदारसंघातून आमदार म्हणून निवडून आले.
१९९९ मध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या स्थापनेनंतर अजित पवार हे पक्षाच्या महत्वाच्या नेत्यांपैकी एक ठरले. काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडीच्या सरकारमध्ये त्यांनी राज्याचे जलसंपदा मंत्री म्हणून जबाबदारी सांभाळली. या काळात सिंचन प्रकल्प, धरणे आणि पाणीपुरवठा योजनांवर त्यांनी विशेष भर दिला.
२०१० साली त्यांची पहिल्यांदा महाराष्ट्राच्या उपमुख्यमंत्रीपदी विराजमान झाले. २०१२, २०१९ आणि २०२३ अशा विविध टप्प्यांवर त्यांनी उपमुख्यमंत्रीपद भूषवले. याच काळात त्यांनी वित्तमंत्री म्हणूनही महत्वाची भूमिका बजावली आणि राज्याचा अर्थसंकल्प सादर केला.
२०१९ मधील राजकीय उलथापालथ हा त्यांच्या कारकीर्दीतील अत्यंत चर्चेचा टप्पा ठरला. अल्पकालीन सरकार स्थापन करून उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतल्यानंतर त्यांनी राजीनामा दिला. पुढे २०२३ मध्ये राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये फूट पडल्यानंतर त्यांनी वेगळा गट स्थापन केला आणि भाजप-शिंदे गटासोबत सत्तेत सहभागी झाले. यावेळी ते पुन्हा उपमुख्यमंत्री बनले. २०२४-२०२५ मध्ये उपमुख्यमंत्री आणि वित्तमंत्री म्हणून काम केले.
बारामती राजकीय बालेकिल्ला
अजित पवार यांचा बारामती हा राजकीय बालेकिल्ला मानला जातो. त्यांनी आपल्या राजकीय कारकीर्दीची सुरुवात स्थानिक पातळीवरून करत राज्याच्या सत्ताकेंद्रांपर्यंत मजल मारली. त्यांनी आतापर्यंत सहा वेळा उपमुख्यमंत्रीपद भूषवले होते. अजित पवार हे महाराष्ट्राच्या राजकारणातील एक अत्यंत प्रभावी, चर्चित आणि अनुभवी नेते होते. स्पष्ट वक्तव्ये, कडक प्रशासकीय भूमिका आणि जलद निर्णयक्षमता ही त्यांची ओळख होती.











