Ajit Pawar death : राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष तथा राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या पार्थिवावर आज गुरुवारी (दि. २९ जानेवारी) सकाळी ११ वाजता बारामतीतील विद्या प्रतिष्ठानच्या मैदानावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार केले जाणार आहेत. पार्थिव विद्या प्रतिष्ठानच्या दिशेने रवाना झाले आहे. यावेळी त्यांना ‘गार्ड ऑफ ऑनर’ देऊन मानवंदना दिली जाणार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्यासह दिग्गज नेते अंतिम निरोप देण्यासाठी उपस्थित राहणार आहेत.
अंत्ययात्रा न काढता अजित पवार यांचे पार्थिव थेट विद्या प्रतिष्ठानच्या मैदानावर नेले जाणार असल्याची माहिती समोर आली आहे. आपल्या लाडक्या नेत्याला शेवटचा निरोप देण्यासाठी काटेवाडीत हजारोंच्या संख्येने जनसागर दाखल झाला आहे.
अनेक मान्यवर दाखल
राज ठाकरे, त्यांच्या पत्नी शर्मिला ठाकरे, अभिनेता रितेश देशमुख, महाराष्ट्रातील अनेक कॅबिनेट मंत्री, राष्ट्रवादी काँग्रेसच्या दोन्ही गटांचे आमदार, अनेक मान्यवर अजित पवारांच्या अंत्यसंस्कारासाठी दाखल झाले आहेत.
अजित दादा अमर रहे
अजित पवार यांची अंतिम यात्रा काटेवाडी ते विद्या प्रतिष्ठान असा दहा किलोमीटरचा प्रवास करत असून, रस्त्याच्या दुतर्फा उभे असलेले नागरिक आणि कार्यकर्ते “अजित दादा अमर रहे” अशा भावनिक घोषणा देत आहेत.
पुष्पवृष्टी करत, जड अंतःकरणाने त्यांना अखेरचा निरोप देण्यात येत आहे. त्यांचे सहकारी, मंत्री दत्तात्रय भरणे आणि विजयसिंह मोहिते पाटील यांच्यासह मंत्रिमंडळातील अनेक सदस्य उपस्थित आहेत.










