जळगाव : जुन्या भांडणातून पुन्हा वाद होऊन बाळकृष्ण सदाशिव कोळी (वय ४५) यांच्यावर कोयत्याने वार करीत त्यांचा खून करण्यात आला. बाळकृष्ण यांच्यावर वार होत असताना त्यांना वाचविण्याच्या प्रयत्नात मुलगा जय कोळी (वय १६) हा जखमी झाला. ही घटना बुधवारी (दि. १४ जानेवारी) रात्री भोलाणे गावातील बसस्थानक परिसरात घडली.
तालुक्यातील भोलाणे येथील बाळकृष्ण कोळी व गावातील एका तरुणाचे गेल्या काही दिवसांपासून वाद सुरु होते. बुधवारी रात्री बाळकृष्ण कोळी हे बसस्थानकाजवळ उभे असताना तरुणाने वाद घालत बाळकृष्ण यांच्या मानेवर कोयत्याने वार केले.
वडीलांवर वार होत असल्याचे समजाताच त्यांचा मुलगा जय हा त्यांना वाचविण्याकरीता तेथे आला. संशयिताने त्याच्यावरदेखील वार केले. यामध्ये त्याच्या हाताला गंभीर दुखापत झाली.
गंभीर अवस्थेत बाळकृष्ण कोळी यांना शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात दाखल केले. उपचार सुरु असताना त्यांचा मृत्यू झाला. घटनेची माहिती मिळताच उपविभागीय पोलिस अधिकारी नितीन गणापुरे, स्थानिक गुन्हे शाखेचे निरीक्षक राहुल गायकवाड यांच्यासह कर्मचारी रुग्णालयात दाखल झाले.
दरम्यान, रुग्णालयात नातेवाईकांची मोठ्या प्रमाणात गर्दी झाल्यामुळे पोलिसांचा बंदोबस्त तैनात करण्यात आला. कोळी यांच्यावर वार केल्यानंतर संशयित आकाश हा तेथून पसार झाला-त्याच्या शोधासाठी स्थानिक गुन्हे शाखेचे पथक रवाना झाले आहे.









