Crime News: वराड (ता. धरणगाव) येथे सोलर प्लांटवरील वीजतार चोरुन नेल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला होता. याचा छडा पाळधी पोलिसांनी अवघ्या चार तासांत लावून मुद्देमालासह आरोपीला अटक करण्यात यश मिळवले आहे. सपोनि प्रशांत कंडारे यांची ‘सिंघम स्टाईल’ धडक कारवाई करत चोरट्यांच्या मुसक्या आवळल्या आहे.
पाळधी येथून जवळच असलेल्या वराड येथे बंद पडलेल्या सोलर प्लांटवरील वीजतार चोरी करण्यात आली होती. याबाबत पाळधी पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला होता. याबाबत पाळधी पोलिसांना मिळालेल्या गुप्त माहितीनुसार महामार्गावरील एकलग्न गावाजवळ पोखरी रस्त्याला लागून असलेल्या पाटचारीवरुन आरोपी एका चारचाकी वाहनाने जात असल्याचे समजले. त्यानुसार पोलिसांनी त्यांचा सिंघमस्टाईल पाठलाग करुन त्यांना पकडण्यात आले.
यावेळी बोलेरो पीकअप गाडी क्रमांक एम.एच.04, जी.एफ. 4172 मध्ये वीजतारांच्या बंडलांसह अजय बापू गायकवाड व दोन अल्पवयीन मुले मिळून आली. त्यांना ताब्यात घेऊन पाळधी पोलीस चौकी येथे नेण्यात आले. त्यांनी गुन्ह्याची कबुली देऊन आमचे अजून सहा साथीदार असून त्यांनी चोपडा, अडावद या भागातही चोरी केली असल्याचे कबुल केले आहे. याप्रकरणी अजय गायकवाड यास अटक करण्यात आली असून दोन्ही अल्पवयीन मुलांना रिमांड होम येथे पाठविण्यात आले आहे. ही कारवाई पोलीस अधीक्षक डॉ. महेश्वर रेड्डी, अप्पर पोलीस अधीक्षक कविता नेरकर, चोपडा भागाचे पोलीस उपविभागीय अधिकारी श्री. घोलप, धरणगाव पोलीस निरीक्षक सुनील पवार, पाळधीचे सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रशांत कंडारे, पोलीस उपनिरीक्षक दत्तात्रय बडगुजर, संघपाल तायडे, योगेश सोनवणे, मोहन पाटील आदींच्या पथकाने केली. या घटनेचा पुढील तपास दत्तात्रय बडगुजर हे करीत आहेत.

चोरांच्या आवळल्या मुसक्या
शहर व परिसरात वाढत्या वीजतार चोरीच्या घटनांमुळे नागरिक त्रस्त झाले असताना पोलिसांनी धडाकेबाज कारवाई करत तारचोरांच्या टोळीला अवघ्या चार तासांत जेरबंद केले. या कारवाईचे नेतृत्व पोलीस उपनिरीक्षक प्रशांत कंडारे यांनी केले. संशयित वाहनाचा पाठलाग करत अजय बापू गायकवाड याला ताब्यात घेतले. त्याची कसून चौकशी केली असता, या टोळीत दोन विधीसंघर्षित बालकांसह एकूण नऊ जणांचा सहभाग असल्याची धक्कादायक माहिती समोर आली. पोलिसांनी केलेल्या कारवाईत ॲल्युमिनियम वीज तारा 4 लाख 50 हजार रुपये किमतीच्या (इलेक्ट्रिक पोलवरून चोरलेल्या) तसेच, बोलेरो पिकअप वाहन 6 लाख रुपये किमतीचे (क्र.एमएच 04 जीएफ 4872) असा एकूण 10 लाख 50 हजार रुपयांचा मुद्देमाल पोलिसांनी हस्तगत केला आहे. पोलिसांच्या या कारवाईचे सर्वत्र कौतूक होत आहे.








