Ashok Ladwanjari : राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार गट) व शिवसेने (उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे अधिकृत उमेदवार अशोक सिताराम लाडवंजारी हे प्रभाग क्रमांक १४ ‘अ’ मधून निवडणुकीच्या रिंगणात आहे. कॉर्नर सभेच्या माध्यमातून ते नागरिकांशी संवाद साधत आहेत. दि. ४ जानेवारी रोजी सायंकाळी त्यांनी तांबापूर येथील मच्छी बाजार, डी-मार्ट समोरील परिसर या ठिकाणी कॉर्नर सभा घेतली. यावेळी नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला.

खाटीक महाराष्ट्र झोनल अध्यक्ष रईस खाटीक यांच्यासह परिसरातील नागरिकांशी चर्चा करून त्यांनी प्रभागातील समस्या जाणून घेतल्या. तांबापूर परिसरातील इब्राहिम मशीन जवळील भागातदेखील कॉर्नर सभा घेण्यात आली. यावेळी उमेदवार अशोक लाडवंजारी, राष्ट्रवादी काँग्रेस महानगराध्यक्ष एजाज मलिक, काजी सर, जमील शेख यांच्यासह प्रभाग क्रमांक १४ मधील उमेदवार उपस्थित होते.
उमेदवार अशोक लाडवंजारी यांनी या प्रभागातील समस्या जाणून घेत निवडून आल्यानंतर या भागाचा कायापालट करण्याचा संकल्प करीत उपस्थित नागरिकांना आश्वसित केले. रात्री बे रात्री होणारा पाणीपुरवठा, परिसरातील स्वच्छता यांसह ओपन प्लेसमध्ये तरुणांसाठी हॉल तयार करून देण्याचे आश्वासन दिले.

यावेळी तरुणांनी टाळ्यांच्या गजरात अशोक लाडवंजारी यांचे स्वागत केले. अशोक लाडवंजारी म्हणाले की, राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे सर्वेसर्वा शरद पवार यांचे ८० टक्के समाजकारण आणि २० टक्के राजकारण या तत्त्वानुसार पक्षाचे धोरण असून आपल्या परिसरातील जनतेची सेवा करण्याचा मनोदय असल्याने उमेदवारी करीत असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले.
मागील पंचवार्षिक निवडणुकीत निवडून आलेले उमेदवार महापौर तथा विरोधी पक्षनेते राहून चुकले, मात्र त्यांनी नागरिकांच्या मूलभूत समस्या सोडवण्याऐवजी स्वतःचा स्वार्थ साधला. त्यामुळे त्यांच्या आश्वासनांना बळी न पडता योग्य उमेदवाराला साथ द्या आणि राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे चारही उमेदवारांना विजयी करा, असे आवाहन त्यांनी यावेळी केले.
कायम आपल्यासोबत…
या कॉर्नर सभेत नागरिकांशी संवाद साधतांना अशोक लाडवंजारी म्हणाले की, ”मी निवडणूक जिंकलो तरी आपल्यासोबत आणि हरलो तरी आपल्यासोबत काम करणार” असल्याची ग्वाही त्यांनी यावेळी दिली.
यावेळी महानगर अध्यक्ष एजाज मलिक, काझी सर यांच्यासह मान्यवरांची भाषणे झाली एजाज मलिक म्हणाले की, या परिसरातील विकास साधण्यासाठी सर्वांनी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या उमेदवारांना निवडून देऊन एक वेळेस संधी द्यावी, या परिसरात युनिक उर्दू प्री प्रायमरी स्कूल तांबापूर येथे सातवीपर्यंत शाळा असली तरी विद्यार्थ्यांच्या भवितव्यासाठी दहावीपर्यंत शाळा व्हावी, अशी अपेक्षा व्यक्त करीत चांगल्या व्यक्तींना निवडून द्या, असे आवाहन त्यांनी केले.
कंजरवाडा भागातही पार पडली कॉर्नर सभा
त्यानंतर तांबापूर परिसरातील कंजरवाडा भागात कॉर्नर सभा पार पडली. यावेळी नागरिकांनी आपल्या समस्या मांडल्या. यात प्रामुख्याने ”पाणी, लाईट, गटारी, स्वच्छालय, रस्त्याच्या दुरवस्थेची व्यथा नागरिकांनी मांडली. नागरिकांशी ही समस्या ऐकून घेत, या समस्या सोडवण्याचे आश्वासन अशोक लाडवंजारी यांनी दिले. तसेच गरजू नागरिकांना घरकूल योजना राबविण्याचे देखील आश्वासन त्यांनी दिले.
यावेळी मकबुल तडवी, जमीलद्दीन शेख, रियाज काकर, असिफ खाटीक, नईम खाटीक, फारुख पिंजारी, इरफान खान, हमीद पिंजारी सुलतान, शेख नाझीर खाटीक यांच्यासह परिसरातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.











