वरणगाव : भुसावळ तालुक्यातील ग्रामीण भागात शिवसेनेतर्फे ‘शिवसंपर्क अभियान’ या उपक्रमाचा शुभारंभ सोमवार, ९ फेब्रुवारी रोजी सायंकाळी फुलगाव येथून जिल्हाप्रमुख समाधान महाजन यांच्या उपस्थितीत करण्यात आला.
आगामी जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुका डोळ्यासमोर ठेवून शिवसेनेचा भगवा ग्रामीण भागातील गावागावात आणि घराघरात पोहोचविण्याचा उद्देश या अभियानामागे असल्याचे जिल्हाप्रमुख समाधान महाजन यांनी सांगितले. या माध्यमातून पक्ष संघटन अधिक बळकट करण्यावर भर दिला जाणार असल्याचेही त्यांनी नमूद केले.
या वेळी जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या संभाव्य शिवसेना उमेदवारांच्या तसेच ग्रामीण भागातील ज्येष्ठ नागरिकांच्या भेटीगाठी घेण्यात आल्या.
कार्यक्रमास जिल्हाप्रमुख समाधान महाजन, ज्येष्ठ शिवसैनिक विलास मुळे, तालुका समन्वयक सुभाष चौधरी, शिवसेनेचे नगरसेवक राजेंद्र चौधरी, फुलगावचे सरपंच शाम फुलगावकर, ग्रामपंचायत सदस्य सचिन पाटील, गणेश झोपे यांच्यासह शिवसेनेचे पदाधिकारी व फुलगाव येथील ग्रामस्थ व कार्यकर्ते उपस्थित होते.









