Jalgaon News: जागतिक स्तरावर भारताच्या नेतृत्वाची दखल घेतली जात असताना आणि जागतिक एआय इम्पक्ट समिट सारख्या महत्त्वपूर्ण परिषदेत भारताच्या भूमिकेचे कौतुक होत असताना, या समिटमध्ये काँग्रेसने आंदोलन केले. काँग्रेसचे हे आंदोलन देशाची प्रतिमा मलिन करण्याचा प्रयत्न असल्याचे म्हणत जळगावात भाजप महिला मोर्चाने आंदोलन करत निषेध नोंदविला आहे. यावेळी काँग्रेस पक्ष आणि खा. राहुल गांधी यांचा तीव्र निषेध करण्यात आला.
जागतिक एआय इम्पक्ट समिट या आंतरराष्ट्रीय परिषदेत भारताने कृत्रिम बुद्धिमत्ता क्षेत्रातील आपली भक्कम भूमिका मांडत जागतिक समुदायाचे लक्ष वेधले आहे. भारत तंत्रज्ञान आणि नवोन्मेषाच्या क्षेत्रात वेगाने पुढे जात असताना काही राजकीय पक्षांकडून आंदोलनाच्या माध्यमातून देशाची प्रतिमा डागाळण्याचा प्रयत्न होत असल्याचा आरोप भाजप महिला मोचतर्फे करण्यात आला. जग भारताकडे आशेने पाहत असताना देशांतर्गत राजकारणासाठी अशा प्रकारे आंदोलन करणे ही देशविरोधी मानसिकता असल्याचा आरोप यावेळी करण्यात आला.
या पार्श्वभूमीवर भारतीय जनता पार्टी महिला मोर्चा, जळगाव महानगर यांच्यावतीने मंगळवारी कोर्ट चौक येथील छत्रपती शिवाजी महाराज स्मारकासमोर जाहीर निषेध आंदोलन करण्यात आले होते. या आंदोलनात घोषणाबाजी करत काँग्रेस व युथ काँग्रेसच्या भूमिकेचा निषेध करण्यात आला.
या आंदोलनात जळगाव मनपाच्या महापौर दीपमाला काळे, जिल्हा महिला मोर्चा अध्यक्षा नीतू परदेसी, महिला मोर्चा उपाध्यक्षा ज्योती बर्गे, नगरसेविका उज्ज्वला बेंडाळे, गायत्री राणे, प्रतीक्षा सोनवणे, वैशाली पाटील, तसेच सोशल मीडिया संयोजक पूनम तिवारी यांच्यासह अनेक पदाधिकारी व कार्यकर्त्यांची उपस्थिती होती. याशिवाय छाया सारस्वत चिटणीस, मनीषा नाले, सुमन मराठे, विद्या पाटील, तृप्ती पाटील, नयना दुसाने आदी महिला कार्यकर्त्यांनी सहभाग नोंदवला. भारतीय जनता पार्टी महानगर पदाधिकाऱ्यांमध्ये उदय भालेराव, विशाल त्रिफळी, नितीन इंगळे, राहुल वाघ, महेश पाटील, आकाश मोरे, हर्षल सिखवाल, अमित माळी, उन्मेष चौधरी, निलेश बाविस्कर, भूषण काकडे, हर्षल सोनवणे, अनुराज मराठे, हितेश वाणी आदी कार्यकर्तेही आंदोलनात सहभागी झाले होते.









