पुणे : पुण्यात काँग्रेस नेते हर्षवर्धन सपकाळ यांनी टिपू सुलतान यांना छत्रपती शिवाजी महाराज यांच्या समकक्ष मानावे, असे विधान केल्यानंतर रविवार, १५ रोजी पुणे काँग्रेस भवनाच्या समोर भाजप कार्यकर्त्यांनी या विधानाचा निषेधार्थ मोर्चा काढला, मात्र दोन्ही पक्षांचे कार्यकर्ते आमने-सामने आल्याने हाणामारी, दगडफेक आणि बाटल्यांची फेक झाली.
यात काही काँग्रेस कार्यकर्ते जखमी झाले असून परिसरातील गाड्यांचेही मोठे नुकसान झाले आहे. पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेऊन दोन्ही गटांना शांत करण्याचा प्रयत्न केला. सध्या काँग्रेस भवन परिसरात तणावपूर्ण शांतता असून मोठा पोलीस बंदोबस्त तैनात केला आहे.
तीव्र आंदोलन करण्याचा इशारा
छत्रपती शिवाजी महाराज हे महाराष्ट्राचे आराध्य दैवत आहेत. त्यांच्यामुळेच स्वराज्य मिळाले, तर टिपू सुलतान धर्मांतर करणारा, महिलांवर अत्याचार करणारा आणि अनेकांवर प्राणघातक हल्ले करणारा शासक होता. त्यामुळे दोघांची बरोबरी करणे अयोग्य आहे. हर्षवर्धन सपकाळ यांनी महाराष्ट्राच्या जनतेची जाहीर माफी मागावी; अन्यथा आगामी काळात आणखी तीव्र आंदोलन करण्याचा इशारा यावेळी आंदोलकांनी दिला.








