जळगाव : महापालिका निवडणुकीत भाजपवर पाईप चोरांचा प्रचार करण्याची वाईट वेळ आली आहे, अशी टीका राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार) पक्षाचे ज्येष्ठ नेते तथा आमदार एकनाथ खडसे यांनी केली.
प्रभाग क्रमांक 14 मधील राष्ट्रवादी कॉँग्रेस (शरद पवार) चे अधिकृत उमेदवार अशोक लाडवंजारी, तडवी नाजमीन मकबुल, सना शेख रियाज व जमिलोद्दीन शेख शारिफुद्दीन शेख यांच्या प्रचारार्थ सोमवार, दि.12 रोजी तांबापुरातील हजरत बिलाल चौकात जाहीर सभेचे आयोजन करण्यात आले होते, यावेळी ते बोलत होते.
सभेला राष्ट्रवादी कॉँग्रेसचे जिल्हाध्यक्ष प्रमोद पाटील, महानगराध्यक्ष एजाज मलिक, शिवसेना (ठाकरे) चे संपर्कप्रमुख संजय सावंत, अल्पसंख्याक आघाडीचे जिल्हाध्यक्ष मजहर पठाण, माजी जि.प.अध्यक्ष दिलीप खोडपे, डॉ.अभिषेक ठाकुर, खाटीक समाजाचे महाराष्ट्र झोनल अध्यक्ष रईस खाटीक यांच्यासह मान्यवर उपस्थित होते.
आमदार खडसे यांनी पुढे बोलताना, भोळे यांनी ज्यांच्यावर पाईप चोरीचा आरोप केला, ‘पाईप चोर’ म्हटले, ज्यांच्याविरोधात पुरावे देत गुन्हा दाखल करण्याची मागणी केली. रस्त्यावर उतरून आंदोलन केले, आज त्याच उमेदवारांसाठी त्यांना प्रचार करावा लागतोय, तुमची कीव करावीशी वाटते, असे म्हणत आमदार भोळेंना डिवचले.
तसेच भाजपसाठी निष्ठेने काम करणाऱ्या जुने कार्यकर्ते व जाणते नेते बाजूला पडले आहे. जुन्या, अनुभवी आणि निष्ठावंत नेत्यांवर आज अशा लोकांचा प्रचार करण्याची वेळ आली आहे, हे त्यांचं दुर्दैव आहे, असेही खडसे यांनी सांगितले.
अनाथ मुलांना दत्तक घेणार : लाडवंजारी
यावेळी राष्ट्रवादी कॉँग्रेस (शरद पवार) चे उमेदवार अशोक लाडवंजारी यांनीही मनोगत व्यक्त करत आपला वचननामा जाहीर केला. शहीद अब्दुल हमीद चौक बनवणार, प्रभागात वाचनालय आणि व्यायाम शाळा सुरू करणार, युवकांसाठी स्पर्धा परीक्षा केेंद्र सुरू करणार, प्रभागातील अनाथ मुलांना दत्तक घेणार, आवास योजनेेंतर्गत घर बांधकामासाठी निधी मिळवून देणार, असे आश्वासन त्यांनी यावेळी दिले.










