जळगाव : भाजपचे लोक हे ‘आस्तीन के साप’ आहे. त्यांचा मुख्य अजेंडा हा जाती-धर्माचे राजकारण करणे असून,भाजप कुत्र्याच्या शेपटीसारखा आहे, ती वाकडी ती वाकडीच राहणार, असा घणाघात माजी आमदार संतोष चौधरी यांनी केला.
जळगाव महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर प्रभाग क्रमांक १४ मधील राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार गट) उमेदवारांच्या प्रचारार्थ शहीद अब्दुल हमीद चौक येथे आयोजित सभेत ते बोलत होते.
राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार गट) चे अधिकृत उमेदवार अशोक लाडवंजारी, तडवी नाजमीन मकबूल, सना शेख रियाज, जमीलोनुद्दीन शेख (शारिफूद्दीन शेख) आदी उमेदवार यावेळी उपस्थित होते.
भाजपकडे विकासाचा ठोस अजेंडा नाही. ते लोकांचे लक्ष खऱ्या प्रश्नांपासून दूर ठेवण्यासाठी समाजात तेढ निर्माण करतात. बेरोजगारी, महागाई, शिक्षण, आरोग्य, पाणी आणि मूलभूत सुविधांकडे दुर्लक्ष करून केवळ धार्मिक आणि जातीय मुद्दे पुढे केले जातात. याचा फटका सर्वसामान्य नागरिकांना बसत असून लोकशाही मूल्यांना धोका निर्माण होत आहे.
महानगरपालिकेत सत्तेत असताना भाजपने जळगाव शहराच्या विकासासाठी काय केले, असा सवाल उपस्थित करत, शहरातील अनेक भाग आजही मूलभूत सुविधांपासून वंचित आहेत. राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार गट) हा सर्वसमावेशक विचारांचा पक्ष असून सर्व समाजघटकांना सोबत घेऊन विकास साधण्याची भूमिका घेतो, असेही ते म्हणाले.
अशोक लाडवंजारी काय म्हणाले
यावेळी उमेदवार अशोक लाडवंजारी यांनीही मतदारांशी संवाद साधत, प्रभागातील पाणी, रस्ते, स्वच्छता आणि नागरी सुविधांच्या प्रश्नांना प्राधान्य देण्याचे आश्वासन दिले. सभेला नागरिकांचा मोठा प्रतिसाद मिळाला असून उपस्थितांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या उमेदवारांना पाठिंबा देण्याचा निर्धार व्यक्त केला.









