Chopda News: चोपडा नगरपरिषदने सन 2026-27 या वित्तीय वर्षासाठी तब्बल 302.37 कोटींचा लोकाभिमुख व विकासाभिमुख अर्थसंकल्प कोणतीही करवाढ न करता विशेष सभेत बहुमताने मंजूर केला. नवनियुक्त नगराध्यक्षा नम्रता सचिन पाटील यांच्या नेतृत्वाखाली सादर झालेला हा पहिलाच अर्थसंकल्प असून तो शहराच्या सर्वांगीण विकासाचा रोडमॅप ठरणार असल्याचा विश्वास व्यक्त करण्यात आला आहे.
उत्पन्नाचे प्रमुख स्रोत
या अर्थसंकल्पात उत्पन्नाच्या प्रमुख स्त्रोतात मालमत्ता कर 17.11 कोटी, पाणीपट्टी 4.65 कोटी, न.पा. मालमत्तेपासून भाडे व फी 110.69 कोटी तसेच विविध शासकीय योजनांतून मोठ्या प्रमाणात निधी अपेक्षित आहे. यात अण्णाभाऊ साठे नागरी दलित वस्ती सुधार योजना, नगरोत्थान योजना, विशेष वैशिष्ट्य पूर्ण योजना, महा. सुवर्ण जयंती नगरोत्थान भुयारी गटार योजना, नदी संवर्धन योजना, अमृत योजना, 15 वा वित्त आयोग, स्वच्छ भारत मिशन, सौर ऊर्जा प्रकल्प आदींचा समावेश आहे.
विकास कामांसाठी भरीव तरतूद
या अर्थसंकल्पात रस्ते विकास, भुयारी गटार योजना, विशिष्ट नागरी सेवा सुविधा, नदी संवर्धन, स्वच्छता, सौर ऊर्जा, अग्निशमन बळकटीकरण, नाना-नानी पार्क, नवीन पथदिवे उभारणी आदी कामांसाठी कोट्यवधींची तरतूद करण्यात आली आहे. नगराध्यक्षा नम्रता सचिन पाटील यांनी सांगितले की, आमदार प्रा. चंद्रकांत सोनवणे यांच्या मार्गदर्शनाखाली हा अर्थसंकल्प तयार करण्यात आला असून करवाढ न करता नियोजनबद्ध महसूल संकलनावर भर देण्यात आला आहे. मुख्याधिकारी रामनिवास झंवर व लेखाधिकारी मयुर गर्मा यांनी अर्थसंकल्पाचे सविस्तर सादरीकरण केले. हा अर्थसंकल्प चोपडा शहराच्या उज्वल व शाश्वत विकासाचा संकल्प असल्याचे सभेत नमूद करण्यात आले.








