Devram Lande : पुणे जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष देवराम लांडे हे पुन्हा त्यांच्या हटके आणि अतिउत्साही जल्लोषामुळे चर्चेत आले आहेत. त्यांच्या सून मोनाली अमोल लांडे यांनी घड्याळ या निवडणूक चिन्हावर झेडपी गटात विजय मिळवल्यानंतर देवराम लांडे यांनी अनोख्या पद्धतीने आनंद व्यक्त केला. हातात अजितदादांचा फोटो आणि विजयाचा गुलाल घेत थेट लंगोट बांधून त्यांनी जल्लोष केला.
या जल्लोषाचा व्हिडीओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल झाला असून विविध स्तरांतून प्रतिक्रिया उमटत आहेत. यापूर्वीही जुन्नरमध्ये त्यांच्या वाढदिवसानिमित्त त्यांनी लंगोट आणि गळ्यात पंचा घालून डीजेच्या तालावर नृत्य केल्याचा व्हिडीओ व्हायरल झाला होता. त्या प्रकारावरून त्यांच्यावर सोशल मीडियावर टीकेची झोडही उठली होती.
आता सून मोनाली लांडे यांच्या विजयाच्या पार्श्वभूमीवर देवराम लांडे यांनी त्याच धर्तीवर जल्लोष साजरा केला. काहींनी त्यांच्या उत्साहाचे कौतुक केले असले तरी अनेकांनी हा प्रकार अतिरेकी आणि लोकप्रतिनिधीला न शोभणारा असल्याची टीका केली आहे. तरीही, देवराम लांडे यांच्या या अनोख्या शैलीमुळे राजकीय वर्तुळात त्यांची पुन्हा एकदा चर्चा रंगली आहे.
(आपल्या परिसरातील सामाजिक, राजकीय, शैक्षणिक, क्रीडा, धार्मिकसह विविध क्षेत्रातील बातमी प्रसिद्धीसाठी “डिजिटल शौर्य मराठी”च्या 703038505 या क्रमांकवर पाठवावी.)










