Dhule Crime News : धुळे जिल्ह्यातील साक्री तालुक्यातील पिंपळनेर गावातून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. विवाह समारंभावेळी दोन गटात जोरदार वाद होत या वादातून धारदार शस्त्राने वार केल्याने तीन जणांचा मृत्यू झाला आहे. तर तीन जण गंभीर जखमी झाल्याची माहिती समोर येत आहे. गुरुवारी दुपारच्या सुमारास ही घटना घडली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, सदर घटना धुळे जिल्ह्यातील पिंपळनेर येथील नीलकंठ नगरात गोसावी समाजाच्या लग्नकार्या होते. तत्पुर्वी साखरपुड्याची तयारी सुरू असताना ही घटना घडली आहे. कार्यक्रमासाठी साक्री व सोनगड येथून आलेल्या नातेवाईकांमध्ये आधीपासूनचा वाद होता. तसेच साखरपुड्यापूर्वी काही नातेवाईकांनी व्हॉट्सअॅसपवर आक्षेपार्ह संदेश व व्हिडिओ शेअर केल्याने तणाव वाढला होता. त्या वादातूनच लग्नस्थळी अचानक संतापलेल्या काही जणांनी धारदार शस्त्राने हल्ला केला.
या हल्ल्यात ८ जण गंभीर जखमी झाले. जखमींना उपचारासाठी तातडीने रुग्णालयात दाखल केले असता उपचारादरम्यान तिघांचा मृत्यू झाला. मयतांमध्ये सोनू गोसावी, देवेंद्र पवार, साई गोसावी यांचा समावेश आहे. तर ५ जणांवर उपचार सुरु आहेत. याप्रकरणी सोनगड येथील दोन संशयितांना पोलिसांनी ताब्यात घेतले असून याप्रकरणी पिंपळनेर गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू आहे. लग्नसोहळ्यातील या रक्तरंजित घटनेमुळे पिंपळनेर परिसरात खळबळ उडाली आहे.








