जळगाव : जिल्ह्यासह शहादा व नंदुरबार तालुका केळी लागवडीसाठी अग्रेसर आहे. मात्र, यंदा केळी पिकाला योग्य भाव मिळत नसल्याने शेतकऱ्यांवर केळीचे घड झाडापासून वेगळी करून गुरांना चारा म्हणून विकण्याची वेळ आली आहे.
अनेक वर्षापासून ऊस पिकावर जास्त भर दिला जात होता. परंतु शिरपूर, नवलनगर, साक्री आधी साखर कारखाने बंद झाले आहेत. शहादा समशेरपुर येथील कारखाने सद्यस्थितीत सुरू आहे. त्यामुळे ऊस पिक लागवडीकडे दुर्लक्ष करून केळी पिकाकडे शेतकऱ्यांचे लक्ष वेधले गेले. मात्र, गेल्या दोन वर्षांपासून केळी पिकाला योग्य भाव मिळत नसल्याने शेतकरी आर्थिक संकट सापडला आहे.
राज्यकर्त्यांनी शेतकरी सुखी व आर्थिक रित्या सक्षम कसा होईल याबाबतीत गंभीरपणे विचार करण्याची वेळ आली आहे. आता भाव आहे. पण व्यापाऱ्यांकडून कमी भावात मालाची मागणी, जागतिक मंदी, निवडणुकांचे वारे आदी कारणाने मागणी कमी झाली आहे. नाईलाजाने तयार झालेली केळी शेतकरी गाई पाळणारे ठेलारी यांना मातीमोल भावाने विकत आहेत.
काही शेतकऱ्यांनी तर केळीचे घड लागलेल्या उभ्या झाडांवर नांगर फिरवले आहेत. गेल्या २ वर्षापासून मका, गहू, ऊस, सोयाबीन, केळी यासारख्या बागायती पिकांना योग्य भाव मिळत नाही. एकीकडे महागडी रोपे, खते, वाढती मजुरी, अनियमित वीज पुरवठा या अनेक कारणाने शेतकरी हताश झाला आहे.









