Gulabrao Patil on Eknath Khade : एकनाथ खडसे यांनी अनेकांना त्रास देऊन तुरुंगात टाकले, त्यामुळे आज त्यांच्यावर वाईट वेळ आली असल्याचे वक्तव्य गुलाबराव पाटील यांनी केले होते. यावर प्रतिक्रिया देताना एकनाथ खडसे यांनी ‘गुंड आणि भ्रष्टांनाच त्रास दिला; देत राहणार”, असा पलटवार केला.
खडसे म्हणाले की, ”मी त्रास दिला ही गोष्ट खरी आहे, पण तो त्रास केवळ गुंड प्रवृत्तीच्या आणि भ्रष्ट लोकांनाच दिला. जिल्ह्यातच नव्हे तर जिल्ह्याबाहेर सक्रिय असलेल्या अशा लोकांना कारागृहात पाठवण्यात आवाज उठवला.
मी पालकमंत्री असताना गुलाबराव पाटील जिल्हा परिषदेचे शिक्षण सभापती होते. त्या काळात त्यांना भरपूर मदत केली. आमदारकीच्या वेळीही माझी मदत त्यांना उपयोगी पडली”, असेही खडसे म्हणाले.
गुलाबराव पाटलांनी आत्मचिंतन करावे – खडसे
पालकमंत्री आणि मंत्री असूनही स्वतःच्या नगरपालिकेचा विकास करता आला नाही. याचे आत्मचिंतन गुलाबराव पाटलांनी करावे, असा सल्लाही खडसे यांनी दिला.
गुंड आणि भ्रष्टांनाच त्रास दिला; देत राहणार – खडसे
मुक्ताईनगरातील गुंड प्रवृत्तीचे आणि भ्रष्टाचारी लोकांना आपण त्रास दिला असून, यापुढेही देणार असल्याचे स्पष्ट करत खडसे यांनी आपली भूमिका पुन्हा ठामपणे मांडली.









