Nandurbar News : शासकीय शिक्के आणि कागदपत्रांचा वापर करून जन्म-मृत्यूचे बनावट दाखले देणाऱ्या मोठ्या टोळीचा पर्दाफाश करण्यात नंदुरबार शहर पोलिसांना मोठे यश आले. या प्रकरणी वकिलासह नगरपालिका कर्मचारी आणि सायबर कॅफेचालक, अशा पाच जणांना अटक करण्यात आली.
नंदुरबातील शास्त्री मार्केट परिसरातील आर. के. ऑनलाइन सायबर कॅफेत बनावट शासकीय शिक्क्यांचा वापर करून जन्म-मृत्यूचे बोगस दाखले तयार केले जात असल्याची गोपनीय माहिती नंदुरबार शहर पोलीस ठाण्याचे निरीक्षक नीलेश देसले यांना मिळाली. त्यानुसार पोलिसांनी तातडीने पथक तयार करून कॅफेवर छापा टाकला. यावेळी बनावट शिक्के, दाखले, लॅपटॉप आणि प्रिंटर असा संशयास्पद मुद्देमाल आढळून आला.
पाच जणांना अटक
तपासादरम्यान पोलिसांनी तांत्रिक आणि प्रत्यक्ष पुराव्यांच्या आधारे, अनिल यशवंत कोळी (वय ३४, नगरपालिका ऑपरेटर), रिजवान खान सुभान खान (वय ३२, सायबर कॅफेचालक), इमरान याकूब पिंजारी (वय ४२, वकील), लाला ऊर्फ मोहम्मद अली मोहम्मद युसूफ पटेल (वय ४९, नगरपालिका शिपाई), शेख शफिक शेख इसाक कुरेशी (वय ३९, सायबर कॅफे कर्मचारी) यांना अटक केली.
जिल्हा पोलीस अधीक्षक श्रवण दत्त. एस., अपर पोलीस अधीक्षक आशित कांबळे, उपविभागीय पोलीस अधिकारी संजय महाजन यांच्या मार्गदर्शनात ही कारवाई करण्यात आली. दरम्यान, नागरिकांनी कोणत्याही शासकीय प्रमाणपत्रासाठी केवळ अधिकृत कार्यालये वा शासनमान्य केंद्रांतच संपर्क साधावा. जर काही संशयास्पद आढळल्यास तत्काळ पोलिसांना कळवावे, असे आवाहन पोलीस दलातर्फे करण्यात आले आहे.








