जळगाव : धरणगाव येथे एका इराणी महिलेस तिच्या साडेतीन वर्षाच्या मुलासह अवैधरित्या आश्रय देणाऱ्या संशयितांनी थेट पाकिस्तानात आंतरराष्ट्रीय व्हिडीओ कॉल करत तेथील दोन जणांशी संवाद साधल्याची धक्कादायक माहिती पोलिसांच्या तपासातून समोर आली आहे. दरम्यान, संशयित आरोपींनी पाकिस्तानात संपर्क केल्याच्या माहितीला पोलीस अधीक्षक डॉ. महेश्वर रेड्डी यांनी दुजोरा दिला आहे.
तेहरान (इराण) येथील विदेशी महिलेस तिच्या साडेतीन वर्षाच्या मुलासह धरणगाव येथे अवैधरित्या आश्रय दिला होता. या विदेशी महिलेच्या व्हिसाची मुदत ७ फेब्रुवारी २०२२ रोजी संपली होती. या महिलेस धरणगाव येथील एका दाम्पत्याने स्वतःच्या घरामध्ये जानेवारी २०२५ ते ५ जानेवारी २०२६ पावेतो वास्तव्यास ठेवले. तिच्या वास्तव्याची माहिती जाणीवपूर्वक लपवत तिला आश्रय दिला. व तिच्या वास्तव्यसंदर्भात सी फार्म भरला नाही.
याप्रकरणी गुरुवारी (८ जानेवारी) धरणगाव पोलीस ठाण्यात इराणी म हिलेसह आश्रय देणाऱ्या धरणगावातील दाम्पत्याविरुध्द इमिग्रेशन आणि विदेशी नागरिक कायदा २०२५ चे कलम २४ व ८ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला. गुन्ह्याचा तपास पोलीस उपनिरीक्षक दत्तात्रय बडगुजर हे करीत आहेत.
आश्रय देणाऱ्या दाम्पत्याला अटक
गुन्हा दाखल होताच पोलिसांनी विदेशी महिलेस आश्रय देणाऱ्या दाम्पत्याला ताब्यात घेत अटक केली. त्यांच्याकडून विदेशी महिलेस आश्रय देण्यासंदर्भात विचारपूस केली कोणी मदत केली किंवा कसे? या अनुषंगाने केलेल्या तपासात विदेशी महिलेस सीमकार्ड पुरविल्याची माहिती मिळाली. पोलिसांनी तपासचक्र फिरवून सीम कार्ड पुरविणाऱ्या संशयिताचा शोध घेतला. त्याला ताब्यात घेऊन अटक केली.
संशयितांच्या अटकेनंतर पोलिसांनी त्यांचे मोबाईल हस्तगत केले. मोबाईल आणि कॉल रेकॉर्डची तांत्रिक तज्ज्ञांकडून तपासणी केली. या तपासणीत संशयितांचे थेट पाकिस्तानशी संपर्क असल्याची धक्कादायक प्रकार समजला, अशी माहिती त्रयस्त अर्जदाराच्या वकिलांकडून समजली. गुन्ह्याची व्याप्ती मोठी असण्याची शक्यता सूत्रांनी व्यक्त करत, सर्व पातळीवर सखोल तपास सुरू असल्याचे सांगितले.
विदेशी महिलेच्या संपर्कात कोण?
कायद्याचे उर्द्धधन करून धरणगाव येथे आश्रय देण्यामागे संशयितांचा उद्देश काय? महिलेच्या संपर्कात कोण होते? अथवा महिलेस कोणी आणि कशी मदत केली? याबाबी तपासातून पाहिल्या जात असल्याचे सूत्रांकडून सांगण्यात आले. संशयितांनी पाकिस्तानात कॉल करून सलमानभाई तसेच सलमान खान नामक व्यक्तीशी आंतरराष्ट्रीय व्हिडीओ कॉल तसेच चेंटिंग केल्याचे उघड झाले असत्याचे सूत्रांकडून सांगण्यात आले.
दरम्यान, ‘विदेशी महिलेला आश्रय देणे आणि पाकिस्तानमधील व्यक्तींशी संशयितांचा संवाद आहे. त्यामुळे ही बाब राष्ट्रीय सुरक्षेच्या दृष्टीने गंभीर मानली जात आहे’ असून पोलिसांकडून सखोल तपास सुरू असल्याची माहिती धरणगाव पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक सुनील पवार यांनी दिली.






