जळगाव : बोगस दिव्यांग प्रमाणपत्रप्रकरणी जिल्हा परिषदेचा चौथा कर्मचारी निलंबित करण्यात आला आहे. मुख्य कार्यकारी अधिकारी मिनल करनवाल यांनी या कर्मचाऱ्यावर निलंबनाची कारवाई केली आहे.
राज्याच्या दिव्यांग सक्षमीकरण विभागाच्या आदेशानुसार राज्यातील दिव्यांग कर्मचारी व दिव्यांग व्यक्तींच्या दिव्यांग प्रमाणपत्राची तपासणी मोहीम हाती घेण्यात आली आहे.
या तपासणीत जिल्हा परिषदेच्या चाळीसगाव पंचायत समितीतील नारायण सुखदेव मोरे यांचे दिव्यांगत्व प्रमाणपत्र बनावट आढळून आल्याने जिल्हा परिषद सीईओ मिनल करनवाल यांनी निलंबनाची कारवाई केली आहे.
नारायण सुखदेव मोरे ग्रामपंचायत अधिकारी यांची नियुक्ती दिव्यांग प्रवर्गातून करण्यात आली होती. या अनुषंगाने त्यांची शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय, जळगाव येथे दिव्यांगत्व तपासणी करण्यात आली.
तपासणीदरम्यान मोरे यांचे दिव्यांग प्रमाणपत्रावरील नमूद दिव्यांगत्व व तपासणी दरम्यान आढळून आलेल्या दिव्यांग टक्केवारीत तफावत आढळून आल्याने या प्रकरणात शासनाची दिशाभूल केल्याचा ठपका ठेवून मुख्य कार्यकारी अधिकारी मिनल करनवाल यांनी या कर्मचाऱ्यावर निलंबनाची कारवाई केली आहे.









