जळगाव : गुरुवारी घसरण झालेल्या सोने-चांदीच्या भावात पुन्हा भाववाढ झाली आहे. चांदीच्या भावात पाच हजार रुपयांची वाढ होऊन ती दोन लाख ४७ हजार रुपयांवर पोहोचली आहे. तर सोन्याच्या भावात एक हजार ६०० रुपयांची वाढ होऊन ते एक लाख ३७हजार ८०० रुपयांवर पोहोचले आहे.
८ जानेवारी रोजी चांदीच्या भावात नऊ हजार ५०० रुपयांची घसरण होऊन ती दोन लाख ४२ हजार रुपयांवर आली होती. मात्र त्यात पाच हजार रुपयांची वाढ होऊन ती दोन लाख ४७ हजार रुपये प्रतिकिलोवर पोहोचली, तर एक हजार रुपयांची घसरण झालेल्या सोन्याच्या भावात ९ रोजी एक हजार ६०० रुपयांची वाढ झाली आहे. त्यामुळे ते एक लाख ३७ हजार ८०० रुपये प्रतितोळ्यावर पोहोचले आहे.
भाव वाढीचे काय कारण
विश्लेषकांनी स्पष्ट केले की भाव वाढ प्रामुख्याने नवीन सुरक्षित-निवास मागणी आणि एक्सचेंज-ट्रेडेड फंड (ETF) मध्ये सकारात्मक भांडवल प्रवाहामुळे झाली आहे.
त्यांनी पुढे म्हटले की बाजार अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या इराणबाबतच्या इशाऱ्यांवर बारकाईने लक्ष ठेवून आहे. शिवाय, टॅरिफ-संबंधित बाबींवर अमेरिकन सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयापूर्वी संभाव्य जोखीम आणि अस्थिरता टाळण्यासाठी व्यापारी सावध भूमिका घेत आहेत.









