Gram Panchayat News: राज्यभरातील ग्रामपंचायत स्तरावरील विविध मागण्यांसाठी 20 फेब्रुवारी रोजी (शुक्रवार) राज्यव्यापी आंदोलन करण्यात येणार आहे. या दिवशी राज्यभरातील सर्व ग्रामपंचायती बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
राज्यातील 16 हजारांहून अधिक ग्रामपंचायतींची मुदत संपत आल्याने या ग्रामपंचायतींवर शासकीय कर्मचाऱ्यांची प्रशासक म्हणून नियुक्ती केली जात आहे. मात्र, सरपंच व विद्यमान लोकप्रतिनिधींनाच प्रशासकपदाची जबाबदारी देण्यात यावी, यासह विविध प्रलंबित मागण्यांसाठी राज्यातील सर्व ग्रामपंचायती शुक्रवारी (दि. 20) बंद ठेवण्यात येणार असल्याची घोषणा अखिल भारतीय सरपंच परिषदेने केली आहे.
शासकीय कर्मचारी प्रशासक म्हणून नियुक्त करण्यात आल्याने गावांच्या विकासकामांना मोठा फटका बसत असल्याचा आरोप अखिल भारतीय सरपंच परिषद यांनी केला आहे. या संदर्भात आयोजित पत्रकार परिषदेत अखिलभारतीय सरपंच परिषदेचे अध्यक्ष जयंत पाटील यांनी सांगितले की, सध्या मुदत संपलेल्या ग्रामपंचायतींच्या तुलनेत शासकीय कोट्यातील मनुष्यबळ अपुरे आहे. एका प्रशासकाकडे किमान पाच ते कमाल 20 पेक्षा अधिक गावांचा कारभार सोपवावा लागत आहे. इतका मोठा कार्यभार सांभाळताना गावांना योग्य न्याय मिळण्याची शक्यता कमी आहे. त्यामुळे ग्रामपातळीवर लोकप्रतिनिधींची सक्रिय भूमिका अत्यावश्यक आहे.











