जळगाव : जळगाव महापालिका निवडणुकीसाठी आज (दि. १५ जानेवारी) मतदान प्रक्रिया पार पडत आहे. अशात पिंप्राळा परिसरात दोन तरुणांमध्ये झालेल्या वादातून हवेत गोळीबार करण्यात आल्याची घटना समोर आली आहे. दरम्यान, हा गोळीबार राजकीय नव्हे तर वैयक्तिक वादातून झाल्याचे पोलीस अधिक्षक महेश्वर रेड्डी यांनी सांगतिले.
पिंप्राळाच्या आनंद मंगल नगर परिसरात राहणाऱ्या दोन तरुणांमध्ये जुने वाद होते. दरम्यान, आज ऐन मतदानाच्या दिवशी पुन्हा वाद होऊन एकाने रागाच्या भरात हवेत गोळीबार केला.
या घटनेमुळे परिसरात एकच धावपळ होऊन दहशतीचे वातावरण निर्माण झाले. घटनेची माहिती मिळताच पोलीस अधीक्षक डॉ. महेश्वर रेड्डी यांच्यासह पथक तातडीने घटनास्थळी दाखल झाले.
वैयक्तिक वादातून गोळीबार
दरम्यान, हा गोळीबार दोन गटांतील वैयक्तिक वादातून झाला असून, कोणत्याही राजकीय पक्षाशी संबंध नसल्याचे पोलीस अधिक्षक महेश्वर रेड्डी यांनी सांगितले. तसेच नागरिकांनी अफवांवर विश्वास ठेवू नये, असे आवाहनही त्यांनी केलं.









