Heart Attack Warning: आरोग्याच्या समस्येत हृदयविकाराची समस्या अतिशय गंभीर आहे. या समस्येमुळे अनेकांना आपला प्राण देखील गमवावा लागतो. हृदयविकाराचा झटका हा बऱ्याचदा अचानक येणारा प्रसंग मानला जातो, परंतु तज्ञांच्या मते हा अचानक येणारा प्रसंग नसून हृदयविकाराच्या आधी शरीर काही संकेत देते. तज्ञांचा असा विश्वास आहे की हृदयविकाराच्या झटक्यापूर्वी २४ ते ४८ तास आधी शरीरात काही बदल जाणवतात, जे हृदयविकाराचे संकेत ठरतात. वैद्यकीयदृष्ट्या प्रोड्रोमल विंडो म्हणून ओळखल्या जाणाऱ्या या महत्त्वाच्या कालावधीकडे सामान्य थकवा किंवा गॅसची समस्या जाणवते, ज्याकडे सामान्यतः दुर्लक्ष केले जाते. आणि हीच बाब जीवावर बेतू शकते. त्यामुळे हृदयविकाराच्या आधी शरीर कोणते संकेत देतं हे या लेखात जाणून घेऊया.
वैद्यकीय तज्ज्ञांच्या मते, हृदयविकाराच्या समस्येत हृदयाला होणारा रक्तपुरवठा प्रभावित होतो, हृदयावर दाब वाढतो, अशा परिस्थितीत वेळीच डॉक्टरांचा सल्ला घेतला तर गंभीर नुकसान टाळता येते.
‘या’ लक्षणांकडे करु नये दुर्लक्ष
अचानक थकवा
हृदयविकाराचा झटका येण्यापुर्वी सर्वात सुरुवातीच्या आणि सर्वात सामान्य लक्षणांपैकी एक म्हणजे अचानक आणि अस्पष्ट थकवा. हा थकवा दैनंदिन कामामुळे येणारा नसतो. तर अचानक जाणवतो. या परिस्थितीत काही पावले चालणे, हलके काम करणे किंवा किरकोळ हालचाली देखील अत्यंत थकवतात.
छातीत दाब किंवा जळजळ
हृदयविकाराचा झटका येण्याआधी छातीचे दुखणे नेहमीच तीक्ष्ण आणि त्रासदायक असे नाही. कधीकधी दाब, जडपणा किंवा सौम्य जळजळ जाणवते. बरेचजण या दुखन्याकडे आम्लपित्त किंवा स्नायूंचा ताण समजतात आणि दुर्लक्ष करतात. पण, हा निष्काळजीपणा धोकादायक ठरू शकतो.
श्वास घेण्यास त्रास
जर तुम्हाला विश्रांती घेत असतानाही श्वास घेण्यास त्रास होत असेल, तर हलक्यात घेऊ नये. हृदय शरीराला पुरेसा ऑक्सिजन पुरवत नसल्याने ही समस्या जाणवू शकते. विशेषतः जेव्हा ही लक्षणे अचानक सुरू होतात आणि थकवा किंवा छातीत अस्वस्थता वाटु लागते तेव्हा त्वरित वैद्यकीय मदत घ्यावा.
डावा हात दुखणे
हृदयविकाराच्या समस्येत कधीकधी वेदना छातीपुरती मर्यादित राहत नाही तर ती डाव्या हाताला, खांद्याला, मानाला, जबड्याला, पाठीच्या वरच्या भागात किंवा पोटाच्या वरच्या भागात वेदना जाणवते. ही लक्षणे महिला, वृद्ध आणि मधुमेह असलेल्या लोकांमध्ये अधिक प्रमाणात जाणवते. त्यामुळे हृदयविकाराचे निदान अनेकदा उशिरा होते. यासह अचानक थंड घाम येणे, चक्कर येणे, मळमळ होणे ही लक्षणे देखील चिंताजनक असू शकतात. त्यामुळे अशा प्रकारच्या लक्षणांकडे दुर्लक्ष करु नये.
( डिस्क्लेमर : सदरचा लेख हा उपलब्ध स्रोतनुसार आहे. अधिक माहितीसाठी तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा. )
(आपल्या परिसरातील सामाजिक, राजकीय, शैक्षणिक, क्रीडा, धार्मिकसह विविध क्षेत्रातील बातमी प्रसिद्धीसाठी “डिजिटल शौर्य मराठी”च्या 703038505 या क्रमांकवर पाठवावी.)











