IND vs PAK : 2026 च्या टी-20 विश्वचषक सुरू झाला आहे. मात्र, भारत-पाकिस्तान सामन्यावरील वाद अजूनही सुटलेला नाही. पाकिस्तानने भारताविरुद्धच्या गट सामन्यावर बहिष्कार टाकण्याची घोषणा केल्यापासून हा मुद्दा क्रिकेट जगतात चर्चेचा विषय बनला आहे. दरम्यान, यावर तोडगा काढण्यासाठी आयसीसी-पीसीबीची बैठक थोड्याच वेळात होणार असल्याची माहिती समोर आली आहे.
सूत्रानुसार, पीसीबीच्या निमंत्रणावरून ही बैठक होत आहे. आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेचे (आयसीसी) दोन प्रतिनिधी लाहोरमध्ये दाखल झाले आहेत. तसेच बांगलादेश क्रिकेट बोर्डाचे अध्यक्ष अमिनुल इस्लाम बुलबुलदेखील लाहोरमध्ये दाखल झाले असून, त्यांनी पीसीबीचे अध्यक्ष मोहसिन नक्वी यांची भेट घेतली आहे. थोड्यावर वेळात ते आयसीसीच्या बैठकीत सहभागी होणार असल्याचे सांगितले जात आहे.
बांगलादेशला काय होईल फायदा ?
टी-२० क्रिकेट विश्वचषक स्पर्धेतून बाहेर पडलेल्या बांगलादेश संघासमवेत एकता दर्शवण्यासाठी भारताविरुद्धच्या सामन्यावर बहिष्कार घालण्याचा निर्णय पाकिस्तानने घेतला आहे. परंतु, पाकिस्तान भारताविरुद्ध सामना खेळण्यास सहमत झाला तर याचा फायदा बांगलादेश क्रिकेट बोर्डालाही होणार आहे.
अर्थात बांगलादेश क्रिकेट बोर्डाला स्पर्धेत भाग न घेतल्याने झालेल्या नुकसानाची भरपाई, आयसीसीच्या केंद्रीय महसुलात मोठा वाटा आणि पुढील टी-२० विश्वचषकात थेट प्रवेश, अशी शक्यता वर्तवली जात आहे. या पार्शभूमीवर सदर बैठक होत असल्याचे सांगण्यात येत आहे.
(आपल्या परिसरातील सामाजिक, राजकीय, शैक्षणिक, क्रीडा, धार्मिकसह विविध क्षेत्रातील बातमी प्रसिद्धीसाठी “डिजिटल शौर्य मराठी”च्या 7030385085 या क्रमांकवर पाठवावी.)










