Indus-Ravi: भारताने पाकिस्तान सोबतचा सिंधू जल करार स्थगित केल्यानंतर, पाकिस्तानला दुसरा धक्का देण्यासाठी भारत सज्ज झाला आहे. भारत सरकार रावी नदीतील भारताच्या वाट्याचे पाणी पाकिस्तानला जाण्यापासून रोखण्याची योजना आखत आहे. जर असे झाले तर ऐन उन्हाळ्याच्या तोंडावर पाकिस्तानचे जल संकट आणखी गडद होऊ शकते. या नदीवरील शाहपूर कांडी धरण प्रकल्प जवळजवळ पूर्ण झाला आहे आणि हा प्रकल्प पाकिस्तानसाठी समस्या निर्माण करू शकतो.
जम्मू-काश्मीरच्या मंत्र्यांनी दिली माहिती
शाहपूर कांडी धरणाबाबात माहिती देतांना जम्मू-काश्मीरचे मंत्री जावेद अहमद राणा यांनी माहिती दिली की, सिंधू जल करार स्थगित झाल्यानंतर, पंजाब-जम्मू काश्मीर सीमेवर बांधल्या जाणाऱ्या शाहपूर कांडी धरणाच्या कामाला वेग आला आहे आणि प्रकल्प आता पूर्णत्वाच्या जवळ आला आहे. शाहपूर कांडी धरणाचे काम 31 मार्चपर्यंत पूर्ण होण्याची अपेक्षा आहे.
शाहपूर कांडी धरण पूर्ण झाल्यावर, रावी नदीच्या भारतीय बाजूने पाकिस्तानात जाणारे अतिरिक्त पाणी रोखले जाईल. रावी नदीत साचलेले अतिरिक्त पाणी दुष्काळग्रस्त कठुआ आणि सांबा जिल्ह्यांमध्ये वळवले जाईल. कठुआ आणि सांबा जिल्हे दुष्काळग्रस्त आहेत आणि कांडी परिसरात बांधण्यात येणारा हा प्रकल्प आमचा प्राधान्यक्रम असेही ते म्हणाले.
काय आहे शाहपूर कांडी प्रकल्प
सध्या, रावी नदीच्या पाण्यातील भारताचा वाटा पाकिस्तानलाही जातो. आता, शाहपूर कांडी धरणाच्या मदतीने हे पाणी थांबवून पंजाब आणि जम्मू आणि काश्मीरच्या दुष्काळग्रस्त भागात पुरवले जाईल.
रावी नदीच्या पाण्यातील भारताचा वाटा पाकिस्तानला जाऊ नये म्हणून 1979 मध्ये शाहपूर कांडी धरण प्रकल्पाची योजना आखण्यात आली होती. त्यानुसार माजी पंतप्रधान इंदिरा गांधी यांनी 1982 मध्ये या धरणाची पायाभरणी केली. 2008 मध्ये, या प्रकल्पाला राष्ट्रीय प्रकल्प घोषित करण्यात आले.
3394 कोटींचा प्रकल्प
शाहपूर कांडी धरण प्रकल्पाचा खर्च अंदाजे 3394 कोटी इतका आहे, त्यापैकी 2694 कोटी रुपये पंजाब सरकारने दिले आणि उर्वरित 700 कोटी रुपये केंद्र सरकारने दिले. हे धरण 55 मीटर उंच आणि 7.7 किलोमीटर लांबीचे आहे. या प्रकल्पाच्या मदतीने पंजाबमधील सुमारे 5000 हेक्टर जमीन सिंचनाखाली येणार आहे. तर जम्मूच्या कठुआ आणि सांबा जिल्ह्यातील 32 हजार हेक्टरपेक्षा जास्त जमीन सिंचनाखाली येईल.









