धुळे : शेत शिवारातील गोठ्यात बांधलेल्या गाईवर बिबट्याने हल्ला करत तिला ठार केले. ही घटना साक्रीच्या कासारे येथे दि.९ जानेवारी रोजी घडली. या घटनेमुळे कासारे परिसर आणि शेतकर्त्यांमध्ये दहशतीचे वातावरण निर्माण झाले असून वन्य वाढत्या प्राण्यांच्या संचारामुळे शेतात जाणेही कठीण झाल्याचे शेतकर्त्यांकडून सांगण्यात येत आहे.
कासारे येथील शेतकरी सुभाष देसले यांचे गाव शिवारात शेत असून तिथेच त्यांचा पशुधनाचा गोठा आहे. दि. ९ जानेवारी रोजी पहाटे बिबट्याने गोठ्यात प्रवेश केला आणि बांधलेल्या गाईवर जीवघेणा हल्ला केला.
या हल्ल्यात गाय जागीच ठार झाली. सकाळी देसले शेतात गेले असता, त्यांना हा प्रकार लक्षात आला. त्यांनी तात्काळ पिंपळनेर वनविभागाशी संपर्क साधून घटनेची माहिती दिली. वनविभागाच्या कर्मचाऱ्यांनी घटनास्थळी पाहणी केली. मृत गाईचा रितसर पंचनामा केला आहे.
परिसरात बिबट्याचा संचार वाढला, बंदोबस्ताची मागणी
या परिसरात गेल्या काही दिवसांपासून बिबट्याचा संचार वाढला असून अनेकांना बिबट्याचे प्रत्यक्ष दर्शनही झाले आहे. त्यामुळे वनविभागाने या भागात पिंजरा लावून बिबट्याचा बंदोबस्त करावा, अशी मागणी आता जोर धरू लागली आहे.










