MLA Anil Patil : नंदुरबार येथे माजी आमदारांनी काढलेल्या विजयी मिरवणुकीला पोलिसांनी परवानगी दिली होती का, त्यांना तसा अधिकार आहे का, याबाबत चौकशी करून सखोल तपास व्हावा, यासाठी आपण मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, पोलिस महासंचालक, पोलिस अधीक्षक यांच्याकडे तक्रार करणार असल्याचे आमदार अनिल पाटील यांनी माध्यमांशी बोलताना सांगितले.
पुढे बोलताना आमदार पाटील म्हणाले की, २०१६ मध्ये अमळनेर पालिकेच्या निवडणुकीदरम्यान, शिरीष चौधरी आणि त्यांच्या कार्यकर्त्यांनी आपणास मारहाण केली होती. जय पराजय राजकारणात असेल तर विजय पचवता आला पाहिजे.
अमळनेरच्या संस्कृतीला अशोभनीय काम कोणत्याच पक्षाने किंवा नेतृत्वाने केले नाही. अमळनेरमधून निवडून गेलेल्या लोकप्रतिनिधीने नंदुरबार मध्ये असे कृत्य करावे हे संस्कृतीला शोभणारे नाही.
आम्ही जनतेचा कौल स्वीकारलेला आहे, सत्ता कोणाचीही असो त्यांना सहकार्य करणे ही आमदार म्हणून माझी जबाबदारी आहे. विकासाच्या दृष्टीने कामांना सहकार्य असेल पण चुकीच्या कामांना विरोध असेल, असेही आमदार पाटील म्हणाले.








