होम उत्तर महाराष्ट्र महाराष्ट्र देश राजकारण आरोग्य नोकरी सरकारी योजना राशीभविष्य क्रीडा

Breaking
---Advertisement---

भाजपच्या प्रदेश कार्यकारिणीत उत्तर महाराष्ट्रातून दिग्गजांना स्थान, आ. मंगेश चव्हाण, भैरवी वाघसह पाच जणांना संधी

On: February 25, 2026 2:50 PM
Follow Us:
---Advertisement---

Mumbai News: भाजपच्या महाराष्ट्र प्रदेश कार्यकारिणीची घोषणा प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण यांनी केली आहे. नव्याने जाहीर करण्यात आलेल्या या कार्यकारिणीत राज्यातील विविध विभागांमधून एकूण 43 जणांची विविध महत्त्वाच्या पदांवर निवड करण्यात आली आहे. विशेष म्हणजे या नियुक्त्यांमध्ये उत्तर महाराष्ट्रातून पाच जणांना महत्वपूर्ण स्थान देण्यात आले आहे.

 

उत्तर महाराष्ट्र हा राजकीय दृष्ट्या अतिशय संवेदनशील आणि विविध सामाजिक समीकरणांनी व्यापलेला प्रदेश मानला जातो. अशा पार्श्वभूमीवर भाजपकडून माजी केंद्रीय राज्यमंत्री डॉ. भारती पवार, माजी खासदार डॉ. सुजय विखे आणि आमदार मंगेश चव्हाण यांसारख्या प्रभावी नेत्यांची प्रदेश पातळीवरील नियुक्ती महत्त्वपूर्ण ठरते. डॉ. पवार यांचा आदिवासी व ग्रामीण भागातील प्रभाव, सुजय विखे यांची युवा वर्गातील पकड आणि आमदार चव्हाण यांचा स्थानिक पातळीवरील जनसंपर्क यामुळे पक्ष संघटन अधिक सक्षम होईल, असा विश्वास व्यक्त केला जात आहे. पैकी डॉ. पवार आणि माजी खासदार डॉ. सुजय विखे यांची प्रदेश उपाध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली आहे. तर चाळीसगावचे आमदार मंगेश चव्हाण, जळगावच्या खासदार स्मिता वाघ यांच्या कन्या भैरवी वाघ तसेच रोहिणी नायडू यांची प्रदेश चिटणीस म्हणून निवड करण्यात आली आहे.

नव्या प्रदेश कार्यकारिणीत उत्तर महाराष्ट्रातून केवळ पाच जणांना स्थान मिळाले आहे. मात्र, या पाचही जणांना महत्त्वाच्या जबाबदाऱ्या देण्यात आल्याने त्या भागासाठी हे प्रतिनिधित्व प्रभावी ठरणार असल्याची चर्चा आहे. डॉ. पवार यांचा आदिवासी व ग्रामीण भागातील प्रभाव लक्षात घेता त्यांची प्रदेश उपाध्यक्षपदावरील निवड पक्षासाठी महत्त्वाची मानली जात आहे. तर सुजय विखे यांना संघटनात्मक अनुभव आणि तरुण नेतृत्वाचा चेहरा म्हणून ही जबाबदारी देण्यात आल्याचे समजते. आमदार चव्हाण यांनी जळगाव जिल्ह्यात नुकत्याच पार पडलेल्या नगर परिषदांसह महापालिकेच्या निवडणुकीत मोठी जबाबदारी पार पाडली होती.

त्यामुळे भाजपला चांगले यश मिळाले. मंत्री गिरीश महाजन यांनी नाशिककडे जास्त लक्ष दिल्यानंतर चव्हाण यांनी जळगावचा गड राखला. पक्षाच्या संघटनात्मक रचनेत चिटणीस पद हे केवळ प्रशासकीय नसून, धोरणात्मक दृष्ट्याही अत्यंत महत्त्वाचे मानले जाते. प्रदेश स्तरावरील निर्णयांची अंमलबजावणी जिल्हा, तालुका आणि बूथ स्तरापर्यंत प्रभावीपणे पोहोचविण्याची जबाबदारी चिटणीसांवर असते. बूथ समित्यांची पुनर्रचना, सक्रिय कार्यकर्त्यांची नोंदणी, संपर्क अभियानांचे नियोजन, बैठकींचे आयोजन तसेच संघटनात्मक आढावे तयार करून वरिष्ठ नेतृत्वाला सादर करणे या जबाबदाऱ्या त्यांना पार पाडाव्या लागतात. याशिवाय, निवडणुकीपूर्व नियोजनात चिटणीसांची भूमिका निर्णायक ठरते. मतदार यादींचा अभ्यास, प्रभागनिहाय बळकटीकरण, सामाजिक समन्वय आणि विविध घटकांशी संवाद साधणे या कामांमध्ये त्यांना पुढाकार घ्यावा लागतो. त्यामुळे उत्तर महाराष्ट्रातून नियुक्त झालेल्या नव्या चिटणीसांवर संघटनात्मक कामकाज अधिक गतिमान करण्याची मोठी जबाबदारी आहे.

Join WhatsApp

Join Now

Join Facebook

Join Now

Join Instagram

Join Now

Leave a Comment