Mumbai Pune Expressway Traffic : मुंबई-पुणे द्रुतगती महामार्गावर मंगळवारी (दि. ३ फेब्रुवारी) सांयकाळी घडलेल्या गॅस टँकर अपघातामुळे वाहतूक पूर्णपणे ठप्प झाली होती. अखेर तब्बल २० तासानंतर बुधवारी (दि. ४ फेब्रुवारी) दोन्ही दिशेला जाणारी वाहतूक संथगतीने सुरू करण्यात आली आहे. यामुळे वाहनचालकांसह प्रवाशांना काहीसा दिलासा मिळाला आहे.
अपघात झालेल्या टँकरमध्ये प्रोपलेन हा अतिशय ज्वालाग्राही वायू असल्याने कोणतीही जीवितहानी वा स्फोट होऊ नये, खबरदारीचा उपाय म्हणून पोलिसांसह प्रशासनाने महामार्गावरील दोन्ही बाजूंची वाहतूक तात्काळ बंद केली. टँकर जागेवरून हटवणे धोकादायक असल्याने तज्ज्ञांच्या मदतीने गॅस गळती थांबवण्याचे काम युद्धपातळीवर सुरु करण्यात आले.
अखेर आज बुधवारी गॅस गळती रोखण्यात यश आले आणि अंशतः वाहतूक सुरु करण्यात आली. सध्या मुंबई वाहिनीवरून दोन्ही दिशेला वाहतूक सुरु असली तरी ती संथगतीने सुरु आहे. वाहतूक सुरु झाल्याने वाहनचालकांना व प्रवाशांना मोठा दिलासा मिळाला असून, सायंकाळी ६ नंतर वाहतूक सुरळीत होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.
४२ बसेस रद्द
मात्र, या घटनेचा मोठा फटका एसटी महामंडळाला बसला आहे. पुणे- मुंबई मार्गावरील अनेक लांब पल्ल्याच्या बसेस रद्द करण्यात आल्या असून, स्वारगेट एसटी डेपोहुन आतापर्यंत एकूण ४२ बसेस रद्द झाल्या आहेत. परिणामी प्रवास नियोजन पूर्णपणे कोलमडले आहे.
(आपल्या परिसरातील सामाजिक, राजकीय, शैक्षणिक, क्रीडा, धार्मिकसह विविध क्षेत्रातील बातमी प्रसिद्धीसाठी “डिजिटल शौर्य मराठी”च्या 703038505 या क्रमांकवर पाठवावी.)











