Nagpur Tiger Attack: नागपूर जिल्ह्यातील रामटेक तालुक्यातील देवलापार परिसरातून एक हृदयद्रावक घटना समोर आली आहे. या ठिकाणी वाघाच्या हल्ल्यात शेतात काम करणाऱ्या महिलेचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. देवलापार परिसरातीलल सावरा गावाजवळ शेतशिवारात ही घटना घडली. या घटनेमुळे परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. मुक्ता जोगड्या मरसकोल्हे असे वाघाच्या हल्ल्यात मयत महिलेचे नाव आहे.
देवलापार आणि आसपासच्या गावांमध्ये गेल्या काही दिवसांपासून वाघाचा मुक्त संचार सुरु आहे. शेताच्या बांधावर पायांचे ठसे, जनावरांवर हल्ल्याच्या घटना यामुळे नागरिकांमध्ये आधीच भीती होती. अशात या ताज्या घटनेनंतर दहशतीचे सावट आणखी गडद झाले आहे. मयत मुक्ता या दुपारच्या सुमारास शेतात काम करत असताना अचानक वाघाने त्यांच्यावर झडप घातली. हल्ला अत्यंत भीषण स्वरूपाचा होता. महिलेचा घटनास्थळीच मृत्यू झाला. काही वेळाने इतर शेतकऱ्यांच्या लक्षात हा प्रकार येताच गावकऱ्यांनी मोठ्या संख्येने शेताकडे धाव घेतली. मात्र, तोपर्यंत वेळ निघून गेली होती.
घटनेची माहिती मिळताच वन विभागाचे अधिकारी, कर्मचारी तसेच पोलिस घटनास्थळी दाखल झाले. मृतदेहाचा पंचनामा करून पुढील प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. संबंधित वाघाचा शोध घेण्यासाठी विशेष पथक तयार करण्यात येत असून परिसरात कॅमेरे लावणे, पिंजरे उभारणे आणि गस्त वाढविणे यांसारख्या उपाययोजना हाती घेण्यात आल्या आहेत, अशी माहिती आहे.
दरम्यान, ग्रामस्थांनी वन विभागाकडून तातडीने ठोस पावले उचलण्याची मागणी केली आहे. शेतकऱ्यांना सकाळ-संध्याकाळ शेतात जाणे धोकादायक बनले असून कायमस्वरूपी प्रतिबंधात्मक उपाययोजना, भरपाईची तत्काळ घोषणा आणि वाघाचा बंदोबस्त करण्याची मागणी जोर धरत आहे.
वन विभागाकडून 10 लाखांची मदत
देवलापार परिसरातील सावरा गावात शुक्रवारी दुपारी 1 वाजताच्या सुमारास शेतात काम करणाऱ्या मुक्ता जोगड्या मरसकोल्हे या महिलेवर वाघाने हल्ला केला. या अपघातात महिलेचा मृत्यू झाला, तर तिला वाचवण्याच्या प्रयत्नात तिचा पती जखमी झाला. या प्रकरणी वन विभागाने मृताच्या कुटुंबाला मदत म्हणून 10 लाख रुपयांचा धनादेश दिला आहे.










