Nashik News: नाशिकमध्ये नुकतेच ‘विश्व मराठी संमेलन’ संपन्न झाले. संमेलनात ख्यातनाम लेखक, ज्येष्ठ पत्रकार प्रकाश तेली यांच्या ‘प्रेरणादायी विचार’ या ग्रंथाचे प्रकाशन अत्यंत दिमाखदार सोहळ्यात पार पडले. ज्ञानपीठ पुरस्कार विजेते ज्येष्ठ साहित्यिक डॉ. भालचंद्र नेमाडे यांच्यासह प्रशासकीय आणि साहित्य क्षेत्रातील दिग्गज मान्यवरांच्या उपस्थितीत हा सोहळा संपन्न झाला.
या प्रकाशन सोहळ्याला महाराष्ट्राच्या सांस्कृतिक आणि भाषिक क्षेत्रातील नामवंत उपस्थित होते. यात प्रामुख्याने महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळाचे अध्यक्ष डॉ. सदानंद मोरे, भाषा सल्लागार समिती अध्यक्ष लक्ष्मीकांत देशमुख, भाषा सल्लागार समिती माजी अध्यक्ष दिलीप धोंडगे, मराठी भाषा विभाग सचिव किरण कुलकर्णी, राज्य मराठी विकास संस्था संचालक डॉ. शामकांत देवरे, भाषा संचालनालय संचालक डॉ. मीनाक्षी पाटील व अरुण गीते आदींची उपस्थिती होती.
वास्तववादी लिखाण समाजाला दिशा देईल – डॉ. भालचंद्र नेमाडे
ग्रंथाचे प्रकाशन करताना डॉ. भालचंद्र नेमाडे यांनी प्रकाश तेली यांच्या लेखणीचे कौतुक केले. ते म्हणाले, “प्रेरणादायी विचार हा ग्रंथ केवळ शब्दांचा संग्रह नसून ते एक वास्तववादी लिखाण आहे. आजच्या काळात समाजाला अशा सकारात्मक साहित्याची गरज आहे. प्रकाश तेली यांनी आपले समाजाभिमुख कार्य असेच अविरत सुरू ठेवावे.”
“राष्ट्रबांधणीसाठी अर्पण केलेली लेखणी” – प्रकाश तेली
आपल्या भावना व्यक्त करताना प्रकाश तेली म्हणाले, “हा ग्रंथ समाजहित आणि राष्ट्रबांधणीचा उद्देश डोळ्यासमोर ठेवून लिहिला आहे. मला पूर्ण विश्वास आहे की, हा ग्रंथ वाचकाच्या जीवनात परिवर्तनाची ठिणगी टाकेल. लवकरच ‘शाश्वत विचार’ हा माझा 20 वा ग्रंथ वाचकांच्या भेटीला येईल.”
मिशन पब्लिकेशनच्या संचालिका योगिता तेली यांनी या पुस्तकाचे वर्णन ‘अभिनव पुस्तक’ असे केले असून, इंद्रवदन वरणकर, किरण तेली आणि आर्यन तेली यांनी या निर्मिती प्रक्रियेत मोलाचे सहकार्य केले आहे.
प्रेरणादायी विचार’: जीवनाचा नवा दृष्टिकोन
प्रकाश तेली यांचा हा 19 वा ग्रंथ असून, यापूर्वी त्यांचे 18 सामाजिक ग्रंथ प्रकाशित झाले आहेत. या नव्या पुस्तकात 250 वास्तववादी विचार मांडण्यात आले आहेत. यासह
प्रकाश तेली यांचे विविध ग्रंथ प्रकाशित झाले आहेत यात सडक सुरक्षा, बाल-विवाह, वाढती लोकसंख्या, किसान, मतदानाचे महत्त्व (वोट 1 ते 4), खाद्य सुरक्षा, जलसंवर्धन, मन की बात, वीज बचत, शिक्षणाचे महत्त्व, वृक्षांचे महत्त्व आणि ‘जीवन म्हणजे काय?’ अशा विविधांगी विषयांवर त्यांनी लेखन करून सामाजिक प्रबोधन केले आहे.









