NCP Merger : दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या निधनानंतर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या विलिनीकरणाबाबत सध्या जोरदार चर्चा सुरु आहे. या संभाव्य विलिनीकरणाबाबत सुरू असलेल्या चर्चेबाबत एक मोठा दावा समोर आला आहे. राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या साप्ताहिकातून हा खळबळजनक दावा करण्यात आला आहे. या साप्ताहिकात शरद पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष शशिकांत शिंदे यांनी साप्ताहिकातील अध्यक्षीय लेखात म्हटले आहे की, “विलिनीकरण झाल्यानंतर पक्षाचे संपूर्ण नेतृत्व अजित पवार यांच्याकडे सोपवण्याचा निर्णय आमचा होता.” पक्षाच्या या साप्ताहिकातील दाव्यामुळे राज्यात राजकीय चर्चा जोरात रंगली आहे.
विलिनीकरण चर्चांना उधाण
दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या विमान अपघातातील मृत्यूनंतर राज्याच्या राजकारणात मोठी खळबळ उडाली आहे. या अपघातानंतर विविध राजकीय चर्चांना देखील उत आला आहे. अजित पवार यांच्या निधनानंतर त्यांच्या पत्नी सुनेत्रा पवार यांनी उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतली. या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेसच्या दोन्ही गटांतील विलिनीकरणाच्या चर्चांनी पुन्हा जोर धरला आहे. जरी स्वतः शरद पवार यांनी सार्वजनिकपणे विलिनीकरणाच्या चर्चांपासून स्वतःला दूर ठेवले असले, तरी पडद्यामागे हालचाली सुरू असल्याचे संकेत सातत्याने मिळत आहेत.
‘दादांचे स्वप्न अपूर्ण राहिले: शशिकांत शिंदे
राष्ट्रवादी काँग्रेस शरद पावर पक्षाच्या साप्ताहिकात राष्ट्रवादी काँग्रेच्या विलिनीकरणाबाबत मोठा दावा करण्यात आला आहे. साप्ताहिकाच्या लेखात पक्षाचे प्रदेशाध्यक्ष शशिकांत शिंदे यांनी नमूद केले आहे की, विलिनीकरणानंतर आम्ही पक्षाचे सर्व नेतृत्व अजित पवार यांच्याकडे देणार होतो. पण दादांचे स्वप्न अपूर्ण राहिले आहे. त्यामुळे आपली जबाबदारी आहे की, दादांचे स्वप्न पूर्ण करायचे. त्यासाठी प्रत्येकाने मन मोठं करून प्रामाणिक प्रयत्न केले पाहिजेत आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष विलिनीकरण घडवून आणून पक्ष पुन्हा मजबुतीने उभा करणे, हीच दादांना खरी श्रद्धांजली ठरेल, असे शशिकांत शिंदे यांनी लेखात म्हटले आहे.
दरम्यान, या लेखानंतर राजकीय चर्चांना उधाण आले आहे. विलिनीकरणाबाबत खुद्द शरद पवार यांनीच 12 फेब्रुवारीला विलिनीकरणाचा निर्णय होणार होता, असे वक्तव्य केले होते. याच मुद्द्यावर बोलताना खासदार सुप्रिया सुळे भावूक झाल्या होत्या. तर आमदार रोहित पवार यांनी पत्रकार परिषद घेऊन विलिनीकरणाबाबत आपल्याकडे पुरावे असल्याचा दावा केला होता. आता शशिकांत शिंदे यांनी केलेल्या दाव्याने राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले आहे.
(आपल्या परिसरातील सामाजिक, राजकीय, शैक्षणिक, क्रीडा, धार्मिकसह विविध क्षेत्रातील बातमी प्रसिद्धीसाठी “शौर्य मराठी”च्या 7030385085 या क्रमांकवर पाठवावी.)











