भुसावळ : येथील इराणी मोहल्यात संशयित आरोपीस पकडण्यासाठी मध्यप्रदेश पोलिसासह गेलेल्या बाजारपेठ पोलिसांवर विटा व काठ्यांचा हल्ला झाल्याची घटना गुरुवारी रात्री घडली. याबाबत १६ संशयितांवर बाजारपेठ पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला. दरम्यान, पोलिसांनी संशयिताला ताब्यात घेतले आहे.
मध्यप्रदेशातील बडोदा येथील गुन्ह्यातील संशयित व भुसावळातील रहिवासी करार अली हुजूर अली याला पकडण्यासाठी मध्यप्रदेश पोलिसांनी बाजारपेठ पोलिसांच्या मदतीने मुस्लिम कॉलनीत पाण्याच्या टाकीजवळ रात्री ११ वाजेच्या सुमारास पथक गेले असता संशयितासह त्यांच्या नातेवाईकांनी बेकायदेशीर जमाव जमवून लाकडाचे दांडके, काठ्या व विटांनी पोलिसांवर जोरदार हल्ला चढवला होता.
यात दोन पोलीस जखमी झाले. संशयित आरोपीस पसार करण्याचा प्रयत्न पोलिसांच्या तत्परतेने फसला. आरोपीस पोलिसांनी ताब्यात घेऊन मध्यप्रदेश पोलिसांच्या स्वाधिन केला आहे.
पोलिसात गुन्हा दाखल
या हल्ल्यात पोलीस कॉन्स्टेबल शुभम जोशी व इतर काही कर्मचारी जखमी झालस. याबाबत शुभम जोशी यांनी १६ जानेवारी रोजी बाजारपेठ पोलीस स्टेशनमध्ये दिलेल्या फिर्यादीवरून मंजू जुल्फोकार अली, बाबर इराणीची पत्नी राजमा तालीम, तालीमची बहीण उसणारा, मरियम जाफर इराणी, मतारी करार अली, सुकीना हसनन अली, नजिया टिपू उंदरी, कनिजा हुजूर अली, कुमेर अब्बास, करार अली व इतर संशयिताविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.









