वरणगाव (ता. भुसावळ) : भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर आदर्श शाळा योजनेअंतर्गत असलेल्या सिद्धेश्वर नगर जिल्हा परिषद प्राथमिक शाळेची अवस्था चिंताजनक बनली आहे. विशेषतः वर्गात जाण्यासाठी पायऱ्या नसल्यामुळे विद्यार्थ्यांना दररोज अपघाताचा धोका पत्करत वर-खाली जावे लागत असल्याचे धक्कादायक वास्तव समोर आले आहे.
मूलभूत सुविधाच नाही
शाळेतील मुतारी, शौचालय, वर्गासमोरील व्हरांडा आणि कंपाऊंड यांचीही अवस्था अत्यंत खराब असून, पावसाळ्यात इमारतीला गळती होत असल्यामुळे वर्गातील परिस्थिती आणखी बिकट होते.
पालकांना चिंता
या समस्येमुळे विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेसह त्यांच्या शैक्षणिक वातावरणावरही नकारात्मक परिणाम होत आहे. पायऱ्या नसल्यामुळे अपघाताचा धोका वाढला असून, स्वच्छतेच्या अभावामुळे मुलांच्या आरोग्यावरही परिणाम होऊ शकतो,” अशी चिंता पालकांनी व्यक्त केली.
मूलभूत सुविधा नसणे ही गंभीर बाब
शिक्षकांनी शाळेच्या दुरुस्तीची गरज अधोरेखित केली. पहिली ते सातवीपर्यंत शिक्षण देणाऱ्या या शाळेत मूलभूत सुविधा नसणे ही गंभीर बाब असल्याचे त्यांनी सांगितले. तसेच स्थानिक नागरिकांनी ही समस्या केवळ शाळेपुरती मर्यादित नसून संपूर्ण समाजाच्या शिक्षणाच्या भवितव्याशी निगडित असल्याचे म्हटले.
शासनाने तात्काळ दखल घ्यावी
शाळा प्रशासनाने अनेकदा जळगाव जिल्हा परिषद व शिक्षण विभागाकडे पाठपुरावा केला असल्याचे समजते. आता प्रशासनाने तातडीने दखल घेत, विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेसाठी आवश्यक उपाययोजना कराव्यात, अशी मागणी होत आहे.
(भुसावळ विभागातील बातम्या तसेच जाहिरातींसाठी संतोष माळी- मो. क्रं. 9673151726, 8830123557 यांच्याशी साधावा.)








