जळगाव : शेतकऱ्यांच्या उत्पादन खर्चाचा विचार करून राज्य शासनाने २०२५-२६ साठी पीक कर्जाच्या किमान दरात भरघोस वाढ केली आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना अधिक वित्तीय आधार मिळणार आहे.
जिल्ह्यात शेतकऱ्यांना दोन हजारांवर कोटीपर्यंत पीक कर्जाचे वाटप सहकारी व राष्ट्रीयीकृत बँकांच्या माध्यमातून केले जाते. अलीकडे रासायनिक खते, पाणीपट्टी, वीज बिले, मजुरी, मशागतीचा वाढलेला खर्चामुळे शेतकरी हवालदिल झाला आहे.
‘या’ पिकांच्या कर्ज दरात वाढ
शेतीमालाचा वाढलेला उत्पादन खर्च पाहून २०२५-२६ या वर्षासाठी राज्य शासनाने पिकनिहाय कर्जदरात वाढ केली आहे. सोयाबीन, तूर, कापूस, बाजरी, ज्वारी, ज्वारी, ऊस, केळी, आंबा, कांद्यासह अन्य पिकांच्या कर्ज दरात ही वाढ करण्यात आली आहे.
आंबा, सोयाबीनसाठी अधिक लाभ
यंदाच्या हंगामात सोयाबीन व आंबा पिकाच्या कर्ज दरात सर्वाधिक वाढ करण्यात आली आहे. ही वाढ ३३ टक्क्यांवर आहे. कापसासाठी मात्र केवळ १८ टक्के वाढ करण्यात आली आहे. कांद्यासाठी मात्र ३० टक्क्यांवर वाढ करण्यात आली आहे.








