JMC Election Results Update : जळगाव महानगरपालिकेच्या ६३ जागांसाठी गुरुवारी सरासरी ५३.५९ टक्के मतदान झाले. आता सर्वांचे लक्ष आज, शुक्रवारी होणाऱ्या मतमोजणीकडे लागले असून, सकाळी १० वाजेपासून मतमोजणीला सुरुवात होणार आहे. सर्वांत आधी टपाली मतपत्रिका मोजल्या जातील. ही संपूर्ण प्रक्रिया १४ टेबलवर आणि ६ विभागांमध्ये विभागली असून, दुपारी २ वाजेपर्यंत संपूर्ण निकाल जाहीर होण्याची शक्यता आहे.
जळगाव महानगरपालिकेच्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी गुरुवारी (दि. १५ जानेवारी) सकाळी ७:३० वाजता मतदानाला सुरुवात झाली तेव्हा मतदारांमध्ये काहीसा निरुत्साह दिसून आला होता. सकाळी ९:३० वाजेपर्यंत अवघे ५.५ टक्के इतक्या कमी मतदानाची नोंद झाली होती. मात्र, दुपारनंतर मतदानाचा वेग वाढत गेला. सायंकाळी ५:३० ही मतदानाची अधिकृत वेळ संपल्यानंतरही अनेक केंद्राच्या आवारात असलेल्या मतदारांना प्रवेश देण्यात आल्याने रात्री उशिरापर्यंत अनेक केंद्रांवर मतदान प्रक्रिया सुरू होती. सर्वांत शेवटी साडेआठ वाजेपर्यंत का.ऊ. कोल्हे शाळेच्या मतदान केंद्रावर मतदान संपले.
संपूर्ण शहरात मतदान प्रक्रिया शांततेत आणि सुरळीत पार पडल्याची माहिती मुख्य निवडणूक अधिकारी तथा महापालिका आयुक्त ज्ञानेश्वर ढेरे यांनी दिली. मात्र, या प्रक्रियेत काही तांत्रिक अडचणींनी व्यत्यय आणला. एका मतदान केंद्रावर ईव्हीएममध्ये बिघाड झाला, तर दुसऱ्या एका केंद्रावर उमेदवारांचा क्रम चुकल्याचा प्रकार समोर आला. या तांत्रिक बाबींव्यतिरिक्त शहरात पैसे वाटपाच्या तक्रारी मोठ्या प्रमाणावर झाल्या, त्यापैकी एका प्रकरणात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
12 जागा बिनविरोध
जळगाव महापालिकेत निवडणुकीआधी 12 जागा बिनविरोध निश्चित झाल्या आहेत. यामध्ये भाजपच्या सहा आणि शिवसेनेच्या सहा जागांचा समावेश असून, निकालामध्ये भाजप आणि शिवसेनेने आधीच आघाडी घेतली आहे.









