10th and 12th Exam : १० वी व १२ वी परीक्षांच्या पार्श्वभूमीवर जळगाव जिल्ह्यात ‘कॉपीमुक्त अभियान’ प्रभावीपणे राबविण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. यासाठी ड्रोन कॅमेरे, लाईव्ह स्ट्रीमिंग, भरारी पथके व कडक पोलिस बंदोबस्त यांचा वापर करण्यात येणार आहे, अशी माहिती प्रशासनाने दिली.
परीक्षांचे वेळापत्रक
१२ वी परीक्षा १० फेब्रुवारी ते १८ मार्च २०२६ दरम्यान, तर इयत्ता १० वी परीक्षा २० फेब्रुवारी ते १८ मार्च २०२६ या कालावधीत होत आहे.
परीक्षार्थी संख्या
जळगाव जिल्ह्यात १० वी परीक्षेसाठी १४७ परीक्षा केंद्रांवर एकूण ५९ हजार ४२० विद्यार्थी प्रविष्ट झाले असून, त्यामध्ये ३३ हजार ६५३ मुले व २५ हजार ७६७ मुली आहेत. तर १२ वी परीक्षेसाठी ८२ परीक्षा केंद्रांवर एकूण ४८ हजार २३२ विद्यार्थी प्रविष्ट झाले आहेत. त्यामध्ये विज्ञान शाखेचे २६ हजार ८८४, कला शाखेचे १५ हजार ५१४, वाणिज्य शाखेचे ४ हजार ८११ विद्यार्थी असून, व्यावसायिक अभ्यासक्रमासाठी ९७८ तर आयटीआय अभ्यासक्रमासाठी ४५ विद्यार्थी प्रविष्ट झाले आहेत.
इतर प्रतिबंधात्मक उपाय
परीक्षा कालावधीत परीक्षा केंद्राच्या ५०० मीटर परिसरातील सर्व झेरॉक्स सेंटर बंद ठेवण्यात येणार आहेत. परीक्षा काळात अखंडित वीजपुरवठा सुनिश्चित करण्याची जबाबदारी महावितरणकडे सोपविण्यात आली आहे. तसेच बाह्य उपद्रव टाळण्यासाठी प्रत्येक परीक्षा केंद्रावर चोख पोलीस बंदोबस्त तैनात राहणार आहे. विद्यार्थ्यांनी तणावमुक्त व पारदर्शक वातावरणात परीक्षा द्यावी, असे आवाहन जिल्हा प्रशासनाच्या वतीने करण्यात आले आहे.








