JMC Election : महापालिकेच्या ७५ जागांसाठी होणाऱ्या निवडणुकीत महायुतीच्या १२ उमेदवारांची आधीच बिनविरोध निवड निश्चित झाली असून, उर्वरित ६३ जागांसाठी आता भाजपसह शिंदेसेना आणि अजित पवारांच्या राष्ट्रवादीने कंबर कसली आहे. दरम्यान, स्वपक्षातीलच काही बंडखोरांनी आव्हान दिल्यानंतर बदललेली राजकीय परिस्थिती लक्षात घेता महायुतीला काही ठिकाणी मोठा फटका बसू शकतो, अशी कबुली भाजप नेते मंत्री गिरीश महाजन यांनी दिली आहे.
महापालिका निवडणुकीच्या रणधुमाळीत विशेषतः सत्ताधारी महायुतीच्या अधिकृत उमेदवारांना प्रतिस्पर्धी पक्षांपेक्षा आपल्याच पक्षातील नाराज आणि बंडखोर उमेदवारांचा अधिक धसका घ्यावा लागत आहे.
महापालिकेच्या एकूण ७५ जागांपैकी तब्बल २२ जागांवर अपक्ष उमेदवारांनी थेट लढत निर्माण केली आहे. विशेष म्हणजे या अपक्ष उमेदवारांमध्ये सत्ताधारी तसेच प्रमुख राजकीय पक्षांतील बंडखोरांचा मोठ्याप्रमाणावर समावेश आहे.
उपलब्ध माहितीनुसार भाजप आणि शिवसेना मिळून १४ बंडखोर उमेदवारांनी आपापल्या पक्षाच्या अधिकृत उमेदवारांविरुद्ध निवडणूक रिंगणात उडी घेतली आहे.
त्यामुळे या दोन्ही पक्षांची चिंता वाढली आहे. अनेक ठिकाणी मत विभाजनाची भीती अधिकृत उमेदवारांना सतावत आहे. एकूणच बंडखोरांमुळे अनेक प्रभागांतील निवडणुकीची गणिते पूर्णपणे बदलली असून, सत्ताधारी पक्षांसमोर मोठे आव्हान उभे राहिले आहे.
मंत्री महाजनांची कबुली
दरम्यान, स्वपक्षातीलच काही बंडखोरांनी आव्हान दिल्यानंतर बदललेली राजकीय परिस्थिती लक्षात घेता महायुतीला काही ठिकाणी मोठा फटका बसू शकतो, अशी कबुली भाजप नेते मंत्री गिरीश महाजन यांनी दिली आहे.









