Jalgaon – Indore Flight Update : महाराष्ट्रातील सर्वात वेगाने विकसित होत असलेल्या विमानतळांपैकी एक असलेल्या जळगाव विमानतळावरून सध्या मुंबई, पुणे, गोवा आणि हैदराबाद या प्रमुख शहरांसाठी विमानसेवा सुरू आहे. मात्र, आता जळगाव लवकरच विमानसेवेद्वारे इंदूरशी जोडले जाणार आहे. ‘फ्लाय ९१’ या विमान कंपनीने या मार्गावर सेवा सुरू करण्यासाठी हालचाली सुरू केल्या असून, लवकरच याचे अधिकृत नियोजन पूर्ण होणार आहे.
जळगाव विमानतळावर अलीकडेच नाइट लॅण्डिंगसह इतर अत्याधुनिक सुविधा उपलब्ध झाल्या आहेत. या पायाभूत सुविधांमुळे नवीन विमान कंपन्यांना जळगावातून सेवा विस्तारणे सोपे झाले आहे. याच पार्श्वभूमीवर इंदूरची विमानसेवा विनाविलंब सुरू होण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.
दरम्यान, जळगाव ते इंदूर या विमानफेरीचे नियोजन अंतिम टप्प्यात आहे, अशी माहिती छत्रपती संभाजीनगर पर्यटन विकास संस्थेच्या नागरी विमान वाहतूक समिती आणि जनसंपर्क समितीचे अध्यक्ष सुनील कोठारी यांनी दिली.
ही सेवा जळगावकरांसाठी ठरणार मोलाची
सध्या जळगावमधून मुंबई, पुणे यासारख्या प्रमुख शहरांसाठी विमानसेवा सुरू असल्याने प्रवाशांचा वेळ वाचत आहे. आता इंदूरशी थेट कनेक्टिव्हिटी मिळाल्यास खान्देश आणि मध्य प्रदेशातील व्यावसायिक संबंध अधिक दृढ होतील. शैक्षणिक, वैद्यकीय आणि व्यापार या तिन्ही दृष्टीने ही सेवा जळगावकरांसाठी मोलाची ठरणार आहे.








