Jalgaon Mayoral Election : महानगरापालिकेच्या महापौर आणि उपमहापौर पदाची निवड लांबणीवर पडली असून नव्या कार्यक्रमानुसार ६ फेब्रुवारी, २०२६ ही निवड होणार आहे. दि. २८ ते ३० जानेवारी या कालावधीत महापौर, उपमहापौर पदासाठी अर्ज विक्री होणार आहेत. तर २ फेब्रुवारी रोजी दुपारी ४ वाजेपर्यंत अर्ज दाखल करता येणार आहे.
निवडणूक आयोगाने जाहिर केलेल्या कार्यक्रमानुसार ३० किंवा ३१ जानेवारी रोजी ही निवड होणार होती. ६ फेब्रुवारी २०२६ रोजी सकाळी ११ वाजता जळगाव महापालिका सभागृहात विशेष बैठक आयोजित करण्यात आली आहे.
महापौर व उपमहापौर यांच्या निवडीसाठी जिल्हाधिकारी रोहन घुगे यांची पीठासीन अधिकारी म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. याच बैठकीत दाखल झालेल्या अर्जाची छाननी होणार आहे. त्यानंतर माघारीसाठी १५ मिनिटे दिले जाणार आहेत. त्यानंतर महापौर निवडीसाठी मतदान घेतले जाणार आहे.
या कार्यक्रमाचे पत्र महापालिका आयुक्त ज्ञानेश्वर ढेरे यांनी २७ जानेवारी रोजी जिल्हाधिकाऱ्यांना दिले. महानगरपालिकेच्या महापौर, उपमहापौर निवडीच्या संदर्भात विभागीय आयुक्त डॉ. प्रवीण गेडाम यांनी २६ जानेवारी रोजी विभागातील सर्व आयुक्तांची ऑनलाईन बैठक घेऊन निवडीची तारीख जाहिर केली.
महापौर निवडीचे नवीन वेळापत्रक
अर्ज विक्री २८ जानेवारी ते ३० जानेवारी होणार असून, अर्ज दाखल करण्याची अंतिम मुदत २ फेब्रुवारी, दुपारी ४:०० वाजेपर्यंत आहे. महापौर, उपमहापौर निवड ६ फेब्रुवारी, सकाळी ११:०० वाजता मनपा सभागृह होईल.








