PM Modi Speech : संसदेच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनादरम्यान गुरुवारी लोकसभेत 2004 ची परिस्थिती पाहायला मिळाली. अर्थात 2004 नंतर पहिल्यांदाच राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या अभिभाषणावरील आभार प्रस्ताव पंतप्रधानांच्या उत्तराशिवाय मंजूर करण्यात आला. सततच्या गदारोळ आणि विरोधकांच्या निषेधाने, सभापतींनी आवाजी मतदानाने हा प्रस्ताव मंजूर केला.
पंतप्रधान नरेंद्र मोदी बुधवारी राष्ट्रपतींच्या अभिभाषणावरील आभार प्रस्तावाला उत्तर देणार होते. तथापि, विरोधी खासदारांच्या सततच्या घोषणाबाजी आणि गोंधळामुळे सभापतींनी लोकसभेचे कामकाज तहकूब केले.
विरोधकांचा निषेध, सभागृह तहकूब
निषेध कमी होण्याची चिन्हे न दिसता सभापतींनी सभागृह दुपारी २ वाजेपर्यंत तहकूब केले. गुरुवारी सकाळी ११ वाजता सुरू झालेले कामकाज काही वेळातच तहकूब करावे लागले.
विरोधीपक्षांचा आरोप
विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांना लोकसभेत बोलण्याची संधी न दिल्याचा मुद्दा विरोधी पक्षाच्या खासदारांनी उपस्थित केला. सरकारने राहुल गांधींना सभागृहात बोलण्यापासून रोखले. २०२० च्या चीन सीमा संघर्षाशी संबंधित माजी लष्करप्रमुख एमएम नरवणे यांच्या अप्रकाशित आत्मचरित्राचा उल्लेख करू दिला नाही, असा आरोप विरोधी पक्षाने केला.
आठ काँग्रेस खासदार निलंबित
सरकार आणि विरोधी पक्षातील संघर्ष मंगळवारी आणखी वाढला. परिणामी आठ काँग्रेस खासदारांना बेशिस्तपणाच्या आरोपाखाली अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या उर्वरित कालावधीसाठी निलंबित करण्यात आले.
2004 मध्ये काय घडलं होतं ?
2004 मध्येही अशीच एक घटना घडली होती. अर्थात संसदेत तत्कालीन पंतप्रधान मनमोहन सिंग गोंधळामुळे राष्ट्रपतींच्या भाषणावर उत्तर देऊ शकले नव्हते. पंतप्रधानांना त्यांचं म्हणणं मांडायची संधी मिळाली नाही. त्यामुळे विना उत्तर राष्ट्रपतींच्या भाषणाचा प्रस्ताव मंजूर करण्यात आला होता.
(आपल्या परिसरातील सामाजिक, राजकीय, शैक्षणिक, क्रीडा, धार्मिकसह विविध क्षेत्रातील बातमी प्रसिद्धीसाठी “डिजिटल शौर्य मराठी”च्या 703038505 या क्रमांकवर पाठवावी.)









