जळगाव : रस्त्याने पायी जात असलेल्या खुबचंद प्रेमचंद साहित्या (वय ५८, रा. मोहाडी रोड) या बांधकाम व्यावसायीकाच्या डोळ्यात दुचाकीवरुन आलेल्यांनी स्प्रे मारून त्यांच्या गळ्यातील ८ तोळ्यांची सोन्याची चेन जबरीने लुटून नेल्याची घटना नयनतारा रेस्ट हाऊससमोर घडली. याप्रकरणी एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
शहरातील बांधकाम व्यावसायीक असलेले खुबचंद साहित्या हे नेहमीप्रमाणे मॉर्निंग वॉकसाठी गेले होते. त्यांनी तेथे नाश्ता केल्यानंतर पुन्हा ईच्छादेवी चौफुली मार्गे पायी घराकडे जात होते. यावेळी मोहाडी रस्त्यावरील नयनतारा रेस्ट हाऊससमोर दोन दुचाकीस्वार त्यांच्या समोर आले.
दुचाकीवरून तोंडाला मफलर बांधलेला इसम खाली उतरला व त्याने खुबचंद साहित्या यांच्या डोळ्यावर स्प्रे मारला. त्यानंतर त्याने साहित्या यांना मारहाण केली. ते जमिनीवर पडल्यानंतर त्यांच्या गळ्यातील ८ तोळे वजनाची सोन्याची चेन जबरीने ओढून घेत घटनास्थळावरून पळू गेले.
अज्ञात चोरट्यांविरूद्ध गुन्हा
डोळ्याची आग कमी झाल्यानंतर साहित्या यांनी शोधाशोध केली असता, रस्त्यावर चेनचा तुकडा आणि पेंडल मिळून आले. एमआयडीसी पोलीस ठाण्यात तक्रार दिली. त्यानुसार अज्ञात चोरट्यांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.









