जळगाव : जळगाव महापालिकेच्या निवडणुकीदरम्यान मतमोजणीत फेरफार झाल्याचा आरोप करत उमेदवार आणि त्यांच्या समर्थकांनी घातलेल्या गोंधळानंतर पोलिसांनी केलेल्या लाठीमारामुळे शुक्रवारी दुपारी ४ वाजेच्या सुमारास मतमोजणी ठिकाणी तणावाची स्थिती झाली. याला प्रत्युत्तर म्हणून संतापलेल्या जमावाने पोलिसांवर जोरदार दगडफेक केली, त्यामुळे संपूर्ण परिसरात तणाव निर्माण झाला होता. दरम्यान, रात्री शिंदेसेनेचे जिल्हाप्रमुख विष्णू भंगाळे यांच्या चारचाकी वाहनावर अज्ञातांनी दगडफेक करून तोडफोड केल्याची घटना घडली. यामुळे परिसरात राजकीय वातावरण तापल्याचे चित्र आहे.
शिंदेसेनेचे जिल्हाप्रमुख विष्णू भंगाळे यांचे वाहन निवासस्थानाबाहेर पार्किंग केले होते. दरम्यान, रात्री अज्ञातांनी या वाहनावर दगडफेक केली. यात वाहनाचे मोठे नुकसान झाले असून, या घटनेमागचे कारण मात्र अद्याप अस्पष्ट आहे.
विष्णू भंगाळे यांनी व्यक्त केला संताप
दरम्यान, विष्णू भंगाळे यांनी तीव्र संताप व्यक्त करत, या घटनेमागील व्यक्तीस वेळीस ठेचून कारवाई करण्याची मागणी त्यांनी केली आहे. परिणामी परिसरात राजकीय वातावरण तापल्याचे चित्र आहे.
दुसरीकडे, काल निवडणुकीदरम्यान मतमोजणीत फेरफार झाल्याचा आरोप करत उमेदवार आणि त्यांच्या समर्थकांनी घातलेल्या गोंधळानंतर पोलिसांनी केलेल्या लाठीमारामुळे शुक्रवारी दुपारी ४ वाजेच्या सुमारास मतमोजणी ठिकाणी तणावाची स्थिती झाली. याला प्रत्युत्तर म्हणून संतापलेल्या जमावाने पोलिसांवर जोरदार दगडफेक केली, त्यामुळे संपूर्ण परिसरात तणाव निर्माण झाला होता. अशात रात्री शिंदेसेनेचे जिल्हाप्रमुख विष्णू भंगाळे यांच्या चारचाकी वाहनावर अज्ञातांनी दगडफेक करून तोडफोड केल्याची घटना घडल्याने, ही घटना पूर्वनियोजित असल्याचा संशय व्यक्त करण्यात येत आहे.








