Jalgaon Weather : जळगाव जिल्ह्यात दोन दिवसांपूर्वी झालेल्या अवकाळी पावसाने रब्बी हंगामाला मोठा फटका बसला आहे. अर्थात सुमारे २१ हजार हेक्टर क्षेत्रावरील पिके भुईसपाट झाली असून, हातातोंडाशी आलेला घास हिरावला गेला आहे. अशात पुन्हा फेब्रुवारी-मार्च महिन्यातदेखील अवकाळीचे संकट राहणार असल्याचा अंदाज हवामान विभागाकडून वर्तवण्यात आला आहे.
हवामान अभ्यासकांनी सांगितले की, फेब्रुवारी व मार्च हे दोन महिने संक्रमणाचे महिने असतात, थंडीचा जोर कमी होऊ लागतो व तापमान वाढू लागते, तापमान वाढल्यामुळे समुद्राच्या पाण्याची वाफ होऊन बाष्पयुक्त ढंग तयार होतात, अशा परिस्थितीत कमी दाबाचे क्षेत्र किंवा वादळी स्थिती निर्माण होते, फेब्रुवारी व मार्च महिन्यांत दोन-तीन वेळा अवकाळी पाऊस होऊ शकतो, असा अंदाज वर्तविण्यात आला आहे.
‘एल निनो’च्या प्रभावामुळे वातावरणात बदल
फेब्रुवारी आणि मार्च महिन्यात रब्बी पिकांची काढणी होते. मात्र, याच काळात जळगाव जिल्ह्यात पुन्हा अवकाळी आणि वादळी पावसाची शक्यता हवामान विभागाकडून वर्तवण्यात आली आहे.
‘एल निनो’च्या प्रभावामुळे वातावरणात सातत्याने बदल होत असून, जानेवारी महिन्यात बहुतांश काळ ढगाळ वातावरण राहिले आहे. आता थंडीची लाट येण्याची शक्यता कमी असून, फेब्रुवारीच्या मध्यापासून मार्चच्या दुसऱ्या आठवड्यापर्यंत पुन्हा पावसाचे सावट राहू शकते, असा अंदाज वर्तविण्यात आला आहे.








